एकाच घरात प्रथमच दोघांना महाराष्ट्र भूषण, लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान
लाखो जनसमूदायच्या साक्षीने ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केला गेला. यावेळी अमित शाह यांनी त्यांचा गौरव केला.
नवी मुंबई : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लाखो जनसमूदायच्या साक्षीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खारघरमधील मैदानात राज्यभरातून आलेल्या लाखो श्री सेवक आणि जनतेच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान केला. शाल, मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे या पुरस्कारचे स्वरुप आहे. यावेळी अमित शहा यांनी आप्पासाहेब आणि नानासाहेब यांच्या कार्यांचा गौरव केला. महाराष्ट्र शासनाने योग्य व्यक्तींची पुरस्कारसाठी निवड केली आहे. प्रथमच एकाच घरातील दोन व्यक्तींना त्यांच्या कार्यामुळे पुरस्कार दिला गेला आहे, असे अमित शाहा यांनी सांगितले.
अमित शाह काय म्हणाले
कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, एखाद्या कुटुंबावर तीन तीन पिढ्या समाजसेवेचा संस्कार मी पहिल्यांदाच पाहिला आहे. यामुळे एकाच कुटुंबात दुसऱ्यांदा हा पुरस्कार दिला गेला आहे. या सोहळ्याला मला बोलवले, हे मी माझे भाग्य समजतो. प्रचंड ऊन असतानाही लाखो श्री सेवक आणि राज्यातील जनता या ठिकाणी सकाळपासून बसून आहे, यावरुनच राज्यातील जनतेच्या मनात आप्पासाहेबांबाबतचा आदर दिसून येतो. दिल्लीतून मी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी आलो आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठानाची गरज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून आप्पासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी म्हटले की, राजकीय अधिष्ठानाला अध्यात्मिक अधिष्ठानाची गरज आहे. ज्या मैदानात नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला, त्याच मैदानात आप्पासाहेबांना पुरस्कार मिळणं हा दैवी योग आहे.
नानासाहेबांनी केला समाजात बदल
बैठक चळवळीचे प्रणेते दिवंगत महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजत आमूलाग्र बदल घडवून आणला. त्यांनी समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे मोलाचे काम केले. समाजाला सकारात्मक वाटेवर घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले की, माणूस पैशाने श्रीमंत होत नाही, तर संस्काराने होता. त्यामुळे तुम्ही सगळे श्रीमंत आहात. स्वच्छ मनाशिवाय जीवनात आनंद मिळू शकत नाही. मन स्वच्छ करण्याची कला, ती अप्पासाहेबांच्या निरुपणामध्ये आहे. असे फडणवीस यांनी म्हटले.