’13 जणांचा मृत्यू, अत्यंत क्लेशदायक, माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती’, आप्पासाहेब धर्माधिकारी हळहळले
"श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे", अशा शब्दातं आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दु:ख व्यक्त केलं.
मुंबई : नवी मुंबईच्या खारघर येथे काल पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला 22 लाख श्रीसेवकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर रात्री उशिरा एक धक्कादायक बातमी समोर आली. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या दरम्यान आतापर्यंत 13 श्रीसेवकांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. पण कालच्या कार्यक्रमानंतर 13 श्रीसेवकांच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने खळबळ उडाली. या घटेनवर आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
“महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटूंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे”, अशी भावना आप्पासाहेबांनी व्यक्त केलीय.
‘माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे’
“आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे”, असं आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले आहेत.
दरम्यान, “प्रशासनाकडून श्रीसेवकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्या दोन दिवसात वातावरण बदललं, तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं. आप्पासाहेबांना बघता यावं यासाठी अनेक श्रीसेवक 14 तारखेपासून यायला सुरुवात झाली होती. ते ज्या श्रद्धेने आणि आस्थेने आले होते ते पाहता त्यांना थांबवणं आणि रोखणं बरोबर नव्हतं. सगळ्यांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँकपासून प्राथमिक उपचारांसाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती”, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.