हीच का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या, जरांगे यांना अटक करा; Gunaratna Sadavarte कडाडले
प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरावर हल्ला झाला आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. गुणतरत्न सदावर्ते यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतानाच प्रचंड संतापही व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी | 26 ऑक्टोबर 2023 : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली. तीन तरुणांनी सदावर्ते यांच्या घराच्या खाली येऊन ही तोडफोड केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे काय? असा सवाल करतानाच मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
घराच्या पार्किंगमध्ये वाहनांची तोडफोड झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी खाली येऊन वाहनांची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रचंड संताप व्यक्त केला. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. हीच का मनोज जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या आहे का? झेपणार नाही आणि पेलणार नाही असं मनोज जरांगे म्हणत होते. ते हेच आहे काय? असा सवाल करतानाच मला कोणीच शांत करू शकणार नाही, असा इशाराच गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
जरांगेंचे लाड करू नका
माझ्या घरासमोर येऊन काही लोकांनी रेकी केली होती. एका चॅनलने हे दाखवलं. हे षडयंत्र आहे. मी थांबणार नाही. मी विद्यापीठ आणि कॉलेजात जाऊन गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. माझं सरकारला म्हणणं आहे, एकट्या जरांगेंचं ऐकू नका. आमचंही ऐका. जरांगेचे लाड थांबवले नाही तर मीही प्राणांतिक उपोषण करेल. पाणी घेऊन उपोषण होत नाही. सलाईन लावून उपोषण होत नाही, असा टोलाही त्यांनी जरांगे पाटील यांना लगावला. या प्रकरणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पत्नी, मुलीला धमक्या
50 टक्के जागा खुल्यावर्गासाठी असतात. त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीजातीत विभागलं जाऊ नये, गुणवत्तेत भर पडावा यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाच्या आणि घामाचं नुकसान केलं. तुम्ही 32 पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. मला धमक्या देण्यात आल्या होत्या. माझ्या मुलीला मारहाण करण्याच्या धमक्या आल्या. त्यामुळे ती सहा महिन्यापासून शाळेत जात नाही. माझी पत्नी जयश्रीला उचलून नेण्याच्या धमक्या आल्या, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न होता
मलाही धमक्या आल्या. त्याचे व्हिडीओ कॉल आहेत. सोशल मीडियावरूनही धमक्या आल्या. काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो त्यावेळी त्यांनी माझ्यासमोर ज्वॉईंट पोलीस ऑफ कमिशनरला फोन लावला होता. एका कॅबिनेट मंत्र्याने डीसीपी चिमटे यांना फोन केला. म्हणजे पोलिसांकडे माहिती होती. तरीही पोलिसांसमोर येऊन वाहनांची तोडफोड केली. माझ्या घरात घुसण्याचाही हल्लेखोरांचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
त्यांच्या मुसक्या आवळा
जातीजातीत विभागून देशाचे तुकडे केले जाऊ शकतात. ते तुकडे होऊ नये ही माझी इच्छा आहे. माझी हत्या जरी झाली तरी मी गुणवंतांसाठी लढा सुरूच ठेवेन. महाराष्ट्रातील या घटनांची शृंखला ही पोलिसांवरील हल्ल्यापासून सुरू झाली. ती माझ्या घरावर आली. ज्या माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले. त्या जरांगेंना अटक करा. त्यांच्या मुसक्या आवळा, अशी मागणीही त्यांनी केली.