Arvind Sawant : तुम्ही शिवसेनेचे नाहीत अन् भाजपाचेही, संयमानं बोला; बॅनर फाडल्याच्या घटनेवरून अरविंद सावंतांचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर
प्रसाद लाड तुम्ही व्यापारी आहात. तुम्ही संयमी बोला. तुम्ही शिवसेनेचेही नाहीत आणि भाजपाचेही नाहीत. तुम्ही व्यापारी आहात. त्यामुळे तुम्ही जिथे जाता, तिथे तुम्हांला बांग द्यावी लागते, असा हल्लाबोल सावंत यांनी लाड यांच्यावर केला आहे.
मुंबई : भाजपा नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी. तिथे आधी शिवसेनेचा होता. मग तो बॅनर भाजपाने का काढला, याचे उत्तर आधी भाजपाने दिले पाहिजे. वर पुन्हा तुम्ही बॅनर लावता आणि त्याचे समर्थन करता. ते करत असताना तुमची भाषा पळवाटीची, दुटप्पी असल्याची टीका शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी प्रसाद लाड यांच्यवर केली आहे. आम्ही मातोश्री बाहेरचाही बॅनर (Banner) फाडू शकतो, मात्र आमची ती संस्कृती नाही, अशाप्रकारचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी केले होते. त्याला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे संस्कृती नाही म्हणायचे आणि दुसरीकडे फाडू शकतो असे म्हणायचे म्हणजे दुटप्पीपणा आहे. त्यामुळे वाद वाढवण्यापेक्षा संयमी वागा, असे सावंत म्हणाले.
‘…तर चांगला प्रसाद मिळेल’
प्रसाद लाड तुम्ही व्यापारी आहात. तुम्ही संयमी बोला. तुम्ही शिवसेनेचेही नाहीत आणि भाजपाचेही नाहीत. तुम्ही व्यापारी आहात. त्यामुळे तुम्ही जिथे जाता, तिथे तुम्हांला बांग द्यावी लागते, असा हल्लाबोल सावंत यांनी लाड यांच्यावर केला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. सगळ्यांचा बुद्धीदाता, विघ्नहर्ता याचा हा उत्सव आहे. त्यामुळे अशी भाषा वापरू नका. त्याचा प्रसाद मिळतो. वाकडे वागले तर वाकडा प्रसाद मिळेल, चांगले वागले तर चांगला प्रसाद मिळेल, असे ते म्हणाले.
‘हा सत्तेचा माज’
हा सत्तेचा माज आहे. ते बेकायदेशीर सरकारमधील बेकायदेशीर आमदार आहेत, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी संजय गायकवाड यांच्यावर केली आहे. आज ना उद्या समोर येईलच. न्याय हा कधीतरी मिळणार आहे. तेव्हा सगळ्यांना जाग येईल. विद्यमान पोलिसांची वागणूक आम्ही पाहत आहोत. पोलिसांनी न्यायान वागावे, अंतर्मुख व्हावे, असे ते म्हणाले.
‘वर्तन महाराष्ट्राला शोभा देणारे नाही’
कल्याणमधील गणपती देखाव्यावर जे कोर्टाने झापले आहे, त्यावर विचार करावा. कोणी तरी काही देत आहे म्हणून वागू नका, कायद्याची अंमलबजावणी करा, संयमी वागा. कारण बेकायदेशीर सरकारचे आणि पोलिसांचे वर्तन महाराष्ट्राला शोभा देणारे नाही, असे ते म्हणाले.
‘हा शिवसेनेचा हक्क’
दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दुसरे जे मेळावे घेणारे आहेत, त्यांना स्वत:ला माहीत नाहीत, ते कोण आहेत. त्यामुळे तो दसरा की कचरा मेळावा आहे, असा घणाघात करत दसरा मेळावा, हा शिवसेनेचा हक्क आहे, तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
काय म्हणाले अरविंद सावंत?
आशिष शेलारांना टोला
प्रतिक्रिया आली की समजायचे, त्यांना तो लागलाय. मराठीतील शब्द हे अगदी चपखल बसतात आणि ते दुखतात. कमळाबाई हे शिवसेनाप्रमुखसुद्धा बोलले आहेत. पण त्याचा अर्थ वेगळा होता. पण त्यांची अल्पबुद्धी आहे, अशी टीका त्यांनी केली.