मुंबई : आर्यन खानला चुकीच्या पद्धतीनं अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. आर्यन खान विरोधात कट रचला जात आहे, असा गंभीर आरोप माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडताना केलाय. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरु आहे. यावेळी आर्यन खानच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद सुरु आहे. (Aryan Khan’s arrest is wrong, Mukul Rohatgi argues in Mumbai High Court)
मला आज दुपारी जामीन अर्जावरील एनसीबीच्या उत्तराची एक प्रत मिळाली आणि मी एक प्रत्युत्तर दाखल केलं आहे. हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंटला आमंत्रित केलं होतं. दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं. ते दोघे एकत्र क्रुझवर गेले होते.
आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स मिळून आलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.
आर्यनची व्हॉट्सअॅप चॅटिंग बाहेर काढण्यात आलं. हे चॅटिंग रेकॉर्डवर नाही. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या फोनमधील चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी संबंध नाही. हे चॅटिंग 2018 – 19 मधील आहे, असा दावाही रोहतगी यांनी केलाय. एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर आमचा कोणताही आरोप नाही. प्रभाकर साईल आणि के.पी गोसावी यांच्या साक्षीशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असंही रोहतगी युक्तिवाद दरम्यान म्हणाले.
आम्हाला कोणताही राजकीय नेता तसेच पंच यांची बाजू घ्यायची नाही. त्यांची बाजू घेऊन हे माझे प्रकरण किचकट करायचं नाही. राजकीय व्यक्ती तसेच पंचांशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असंही रोहतगी यांनी यावेळी स्पष्ट केलं. कोर्टाने रोहतगी यांना आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप चॅटिंगचा क्रूझ पार्टीशी काय संबंध आहे, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना आर्यन खानचं चॅटिंग हे सगळी क्रूझ पार्टीच्या आधीचं असल्याचं रोहतगी म्हणाले.
आर्यन खानचा मोबाईल एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर ड्रग्ज पार्टीचा पंचनामा करण्यात आला. मात्र, या पंचनाम्यात आर्यन खानचा मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख का नाही, असा सवाल रोहतगी यांनी विचारला. त्याचबरोबर रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते.
आर्यन खानचा संबंध अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझ पार्टीत नव्हता. त्याला घरुन अटक करण्यात आलं. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे हे चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झालेलं आहे, असा दावा रोहतगी आणि अमित देसाई यांनी केला. आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा झाल्याचं सांगत ते चॅटिंग न्यायालयासमोर सादर करण्यात आलं.
इतर बातम्या :
तपास अधिकाऱ्याची जात, धर्म काढणं दुर्दैवी; NCB चा वापर राजकीय दबावासाठी का होईल? फडणवीसांचा सवाल
Aryan Khan’s arrest is wrong, Mukul Rohatgi argues in Mumbai High Court