मुंबई : आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी 15 जून 2021 पासून संपावर आहेत. या बेमुदत संपप्रकरणी तोडगा काढण्यासाठी आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात कामगार संघटनांची बैठक बोलावली होती. (Asha Workers Indefinite strike will continue, Talks with health ministers fizzled out)
या बैठकीत राज्य सरकारतर्फे आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये मानधन वाढीचा प्रस्ताव सरकारतर्फे देण्यात आला. महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगत फेटाळला व भरीव वाढ देण्याचा आग्रह धरला.
राज्य सरकारतर्फे योग्य असा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांनी न दिल्याने संप यापुढेही चालू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे, अशी माहिती कृती समितीकडून मिळाली आहे. बैठकीस सरकारच्या वतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे, अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, डॉ. रामदास स्वामी व संघटनांच्या वतीने कृती समितीचे एम. ए. पाटील, डॉ. डी. एल. कराड, भगवानराव देशमुख, राजू देसले, शुभा शमीम, शंकर पुजारी, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, राजेश सिंग उपस्थित होते.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटू प्रणित आशा कर्मचारी युनियनच्या वतीने रविवारी (21 जून) ठाणे जिल्ह्यातील सुमारे 100 आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी निदर्शने केली. राज्यभरात सुमारे 70,000 आशा कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम करावे, किमान वेतन मिळावे, कोव्हिड काळात भत्ता, सुरक्षा साधने, विमा संरक्षण, मोफत आरोग्यसेवा मिळावी या मागण्यांसाठी आशा कर्मचारी 15 जून पासून राज्यात बेमुदत संपावर गेल्या आहेत. मात्र सरकारने अजूनही त्यांची योग्य दखल घेतलेली नाही. त्यामुळेच रविवारी ठाणे जिल्ह्यातील 100 आशा कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दरम्यान, ठाण्यातील निदर्शनांची जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्वरित दखल घेत शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले. कोव्हिड काळात मनपांनी कबूल केलेला भत्ता, मृत आशा कर्माचाऱ्यांना विमा रक्कम तसेच जिल्ह्यातील सर्व आशा कर्माचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवण्याचे तसेच राज्यस्तरीय मागण्यांची शिफारस पुढे पाठवण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात सीटू आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने प्राची हातिवलेकर, सुनील चव्हाण, दत्तू खराड, संगीता प्रजापती, रुद्रा ठोंबरे, विद्या चव्हाण, सोनू खंदारे, अपेक्षा जाधव, गीता माने यांचा समावेश होता. किमान वेतन मिळेपर्यंत आपला संप सुरुच ठेवण्याचा निर्धार यावेळी जिल्ह्यातील सर्व आशा कर्माचाऱ्यांनी केला.
इतर बातम्या
VIDEO: दरेकर, महाजनांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवली; नार्वेकर म्हणाले, शिवबंधन बांधून घ्या!
नाना पटोलेंच्या ‘एकला चलो रे’वर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज?; आघाडीत अस्वस्थता वाढली
(Asha Workers Indefinite strike will continue, Talks with health ministers fizzled out)