अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी गजानन कीर्तीकर म्हणजे विजय निश्चित, आशिष शेलार यांना विश्वास
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज खासदार गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला. “संविधानावर चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि काँग्रेसवाल्यांनी यावे आम्ही तयार आहोत. जागा, तारीख, वेळ तुमची”, असे थेट आव्हानही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिले.
“महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना बदलणार असा अपप्रचार आज विरोधक करीत आहेत. ते हे का विसरत आहेत की, हेच ते कॉंग्रेसवाले आहेत त्यांनी घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कधी प्रेमही दाखवले नाही. तर कॉंग्रेसने आपल्या राजवटीत अनेक वेळा घटना बदलण्याचे काम केले. त्यामुळे आज केवळ खोटे बोलून दिशाभूल करण्याचे काम काँग्रेस करीत आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
‘काँग्रेसचा जाहीरनामा खोटारडेपणाचा कळस’
“काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे असाच एक खोटारडेपणाचा कळस म्हणावा असाचा आहे. त्यांनी जाहीरनाम्याचे नाव न्यायपत्र असे ठेवले आहे. त्यांनी या झुठपत्रात संविधानाचे संरक्षण करण्याची बाब नमूद केली आहे. मग आणीबाणीमध्ये या देशाला कुणी ढकलले? हे आज युवा वर्गाला न्याय देण्याची बात करीत आहेत, मग जेएनयुमध्ये तरुणांची माथी कुणी भडकवली? हे आज शिक्षणाला न्याय देण्याची घोषणा करीत आहेत मग नवे शैक्षणिक धोरण कुणी रोखले?”, असे सवाल आशिष शेलार यांनी केले.
हे भ्रष्टाचार कमी करणार असे आज सांगत आहेत. काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. आदिवासींना न्याय देण्याचे काँग्रेस बोलत आहे. मग आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मु राष्ट्रपती झाल्या त्यावेळी त्यांना काँग्रेसने पाठींबा का दिला नाही? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.