अशोक चव्हाण यांना प्रचंड मोठा धक्का, सहावेळा नगरसेवक राहिलेला कडवा शिलेदार शिंदे गटात; नांदेडमध्ये काँग्रेसचे काय होणार?
निवडणुका जसजशा जवळ येत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यात अनेक उलथपालथ होताना दिसत आहे. या काळात आयाराम आणि गयारामांचीही चलती सुरू झाली आहे.
मुंबई | 7 सप्टेंबर 2023 : निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे अनेक मुद्दे ऐरणीवर येत आहेत. विविध पक्ष, गट आणि संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. पक्ष वाढीसाठी सभा, संमेलनावर अनेक राजकीय पक्षांनी जोर दिला आहे. तर काही राजकीय पक्षांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी बैठकांवर जोर देऊन प्रत्येक मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याच दरम्यान, विविध पक्षांशी युती आणि आघाडीही करण्यास सुरवात केली आहे. तसेच जुन्या मित्र पक्षांना पुन्हा सोबत घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या सर्व रणधुमाळीत आयाराम आणि गयारामांचीही चलती सुरू झाली आहे. नांदेडमधील काँग्रेसचा एक मोठा गटही शिंदे गटासोबत आला आहे. त्यामुळे नांदेडमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मंगेश कदम हे नांदेडचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आणि मागासवर्गीय विभाग विकास काँग्रेस कमिटीचे सदस्य आहेत. कदम यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश हा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना धक्का समजला जात आहे.
काँग्रेसने वापर केला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे आपण शिंदे गटात प्रवेश करत आहोत. काँग्रेस पक्षाने आपला वापर करून नंतर आपल्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागल्याचं मंगेश कदम यांनी म्हटलंय. मंगेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी आणि नांदेडमधील माजी स्थायी समिती सदस्या ज्योती मनीष कदम, अॅड. धम्मपाल कदम, विकास गायकवाड, प्रवीण वाघमारे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. मंगेश कदम हे नांदेड जिल्हा परिषदेचे काँग्रेस पक्षाचे सहा वेळा नगरसेवक होते. तर त्यांच्या पत्नी माजी समिती सदस्य होत्या.
नांदेडची समीरकरणे बदलणार
मंगेश कदम यांचं नांदेडमध्ये प्रचंड वर्चस्व आहे. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्यासारख्या कडव्या शिलेदारानेच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कदम यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. येत्या निवडणुकीत त्याची चुणूक दिसेल असंही सांगितलं जात आहे.
महिलांनी बांधली राखी
दरम्यान, वांद्रे कलानगर येथील मुस्लिम महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली आहे. वांद्रे पूर्व येथील भारत नगर, कला नगर, बीकेसी येथील मुस्लिम बांधव आणि भगिनींनी आज स्थानिक नेते सलिम जफर शेख यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
सद्दाम अब्दुल सत्तार शेख, मुदशीर सिद्धीकी, शमद शेख, सलाना शेख, रेहाना काशु, आफरिन शेख, अब्दुल कादर यांनी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काही मुस्लिम महिलांनी लोकांसाठी काम करणारे ‘लोकनाथ’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटावर राखी बांधली. सर्व धर्मांचा सन्मान करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर बोलताना व्यक्त केले.