पक्ष सोडला, पण माणसं…, पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर अशोक चव्हाण यांची भावनिक प्रतिक्रिया
काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले अशोक चव्हाण यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना कोणाताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तोलूनमोलून बोललं पाहिजे, असं आवाहन केलं.
मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यांना भाजपकडून आता राज्यसभेची उमेदवारीदेखील जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. “अशोक चव्हाण यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेणं हे दुर्देवी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. तसेच त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकाही केली होती. त्यावर अशोक चव्हाण यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “माझ्यापेक्षा माझ्या कारकिर्दीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना अधिक माहीत आहे. ते माझे सहकारी होते. मी त्यांच्या व्यक्तिगत बोलणार नाही. त्यांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तोलूनमापून बोललं पाहिजे. आम्ही त्यांचा मानसन्मानच केला आहे”, अशी भावनिक प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली.
“मला राज्यसभेवर पाठवण्याचं ठरलं होतं असं म्हणणार नाही. त्यांना वाटलं असेल. माझ्या अनुभवाचा उपयोग राज्यसभेत व्हावा असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी मला राज्यसभा दिली असावी. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससाठी काम करत होतो. दोन वर्षापूर्वी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही. मी शेवटच्या दिवशी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. तेव्हा बैठक घेतली आणि संध्याकाळी गाडी पकडून मुंबईत आलो. मला राज्यसभेवर घेतलं याचा अर्थच असं आहे की मी पक्षाला अधिक वेळ द्यावा. मराठवाड्यात प्रचार करावा असं त्यांना अपेक्षित आहे. त्यात काही गैर नाही”, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली.
‘मी मुख्यमंत्री असताना नाना पटोले भाजपात गेले’
“राष्ट्रीय पॉलिसीशी निगडीत लोकसभेच्या निवडणुका होत असतात. देशात मी पाहिलं तर केंद्रात भाजपचं सरकार चांगल्या मताधिक्याने येईल. चांगल्या आकड्याने येईल. महाराष्ट्रातही भाजपला चांगलं यश मिळेल, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपमध्ये गेले होते. त्यावेळी मी त्यांना विनंती केली होती जाऊ नका. पण गेले आणि परत आले. ते करत आहेत काम. पास्ट इज पास्ट. निवडणुका ठरवेल काय ते. नानांबाबत काही असेल तर ते लोकं ठरवतील”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
“केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं मुख्यमंत्रीपदी नाव चर्चेत असताना मी सीएम झालो. राज्यसभेसाठी नाव चर्चेत असताना मला मिळाली. हा योगायोग आहे. आमच्या दोघांचे स्टार कुठे तरी मिसमॅच होतात. परवा त्यांचा मला फोन आला. बऱ्याच वर्षानंतर फोन आला. पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. माझं येणं आणि त्यांची राज्यसभा जाणं याचा काही संबंध नाही”, असा खुलासा अशोक चव्हाण यांनी केला.