मुंबई: अवघे पाचच दिवस राज्यसभेच्या निवडणुकांना (Rajya Sabha Election) बाकी आहेत. त्यामुळे आता शिवसेना (shivsena) आणि भाजपने (bjp) अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने तर अपक्ष आमदारांशी चर्चाही सुरू केली आहे. भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची उद्या 6 जून रोजी बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भजापने आता थेट दिल्लीतील नेत्यांनाच मुंबईत पाचारण केलं आहे. रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव आज मुंबईत दाखल होत आहेत. आज ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यसभेच्या निवडणुकीचा आढावा घेऊन रणनीती ठरवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अश्विनीकुमार वैष्णव मुंबईत येणार येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज बैठक होणार होती. पण फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने आता ही बैठक भाजपच्या कार्यलायात होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस ऑनलाईन बैठकीला हजेरी लावतील. त्यानंतर लगेच दुसरी बैठक होणार असून गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अश्विनीकुमार वैष्णव आज महाराष्ट्रात येणार आहेत. ते निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रात थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजच्या बैठकीत भाजपचं संख्याबळ, आघाडीचं संख्याबळ याचा आढावा घेतला जाईल. शिवाय आघाडीचे कोणते आमदार गळाला लागू शकतात, कोणते आमदार नाराज आहेत यावरही चर्चा होईल. तसेच समाजवादी पार्टीने आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे दोन आमदार कमी होतील. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आघाडीला मतदान न करण्याचे संकेत दिले आहेत. बविआकडे तीन मते आहेत. त्यामुळे आघाडीची पाच मते कमी होणार आहेत. शिवाय अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही तर तीही दोन मते कमी होईल. जर त्यांना मतदान करता आले तर अपक्ष अधिकाधिक अपक्ष आपल्याकडे कसे येतील यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आजची बैठक ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.