मोदीजी, महाराष्ट्र सरकारला राजीनामा द्यायला सांगा; उद्धव ठाकरे यांची थेट मागणी
महाराष्ट्राची ही बदनामी थांबली पाहिजे. नरभक्षकासारखं सत्ता भक्षक होऊ नका. सत्ता पिपासूपणा एक वेगळा भाग आहे. त्यामुळे तातडीने या सरकारला पायउतार घेण्यास भाग पाडावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राजकारण आपल्या जागेवर आहे. पण सवाल देशाची प्रतिमा आणि हिंदुत्वाची प्रतिमेचा आहे. आपल्या देशाची जगात बदनामी होत आहे. आपल्या देशात चुकीच्या गोष्टी होत आहेत. मोदीजी, या चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना रोखा. महाराष्ट्राच्या सरकारला राजीनामा द्यायला सांगा. आम्ही जनतेच्या कोर्टात जाऊ, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो. राजकीय मतभिन्नता लोकांसमोर मांडू. पण देशात नंगानाच सुरू आहे. बेबंदशाही सुरू आहे. त्याने देशाची आणि तुमची बदनामी होत आहे. ही बेबंदशाही करणाऱ्यांना चाप लावा. मोदीजी तुमच्या कारभाराचे धिंडवडे 33 देशात नव्हे, जगातही निघतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही 25 ते 30 वर्ष युतीत होतो. आम्हाला वाण नाही पण थोडा काळ गुण लागला असं त्यांना थोडा काळ वाटलं असेल. महबूबा मुफ्ती यांच्यासोबत सत्तेचा पाट मांडला. ती नैतिकता वाटते काय? असा सवाल त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.
बदनामी थांबवा
नरभक्षकासारखं सत्ता भक्षक होऊ नका. सत्ता पिपासूपणा एक वेगळा भाग आहे. गद्दारी करून, हरामखोरी करून सत्ता मिळवली. हिंदुत्वाच्या रक्षणाची जबाबदारी बाळासाहेबांनी आपल्या शिरावर घेतली होती. पण शिवसेना आपली बटीक करण्याचा डाव कोर्टाने उधळला आहे. त्यामुळे ही बदनामी थांबवावी. तातडीने या सरकारला पायउतार घेण्यास भाग पाडावं. लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी मोदींना केलं.
निर्णयावर समाधानी
महाराष्ट्राची ही बदनामी थांबली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्री केलं असतं, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. याचाच अर्थ असा हे सरकार बेकायदेशीर आहे. पण त्यावेळी मी घेतलेल्या माझ्या निर्णयावर आजही समाधानी आहे. नैतिकतेला जागून मी राजीनामा दिला. ज्या लोकांना आम्ही सर्व काही दिलं. त्या गद्दारांना आपलं मानलं. ज्या विश्वास घातक्यांनी माझ्यावर अविश्वास दाखवावा हे मला मान्य नव्हतं. म्हणून मी राजीनामा दिला. त्याबद्दल मी समाधानी आहे, असं त्यांनी सांगितलं.