राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची बदली, आरोप काय?
आता केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यामागचे कारणही समोर आले आहे.
Rashmi Shukla Transfer : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यातच आता एक मोठी घडामोड घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. रश्मी शुक्ला यांची बदली करण्यामागचे कारणही समोर आले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच तब्बल २८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात १५ अधिकारी हे मुबंईतील होते. तसेच राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यात रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. त्यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी नियमबाह्य काम केली आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावण्याची कामेही त्यांनी केली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
यामुळे २० नोव्हेंबरपूर्वी त्यांची बदली करावी. रश्मी शुक्ला जोपर्यंत या पदावर आहेत, तोपर्यंत राज्यात निष्पक्ष निवडणूक होणे अवघड आहे, असा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला होता. याबद्दल नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील पाठवले होते. अखेर आज निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
रश्मी शुक्लांवर आरोप काय?
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात, असा आरोप केला होता.
तसेच रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असते. रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. 1988 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला फेब्रुवारी 2021 केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. 2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना सरकारने पोलीस महासंचालकपदी (DG) प्रमोशन दिलं. त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली.