मुंबई: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. जातीयता आणि धर्मांधता बाजूला ठेवून राजकारण करता येतं हे वाजपेयींनी शिकवलं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू होतेॉ. माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम पाहता आलं. त्यांनी देशाचे नेतृत्त्व केलं. पक्षाचं नेतृत्त्व नव्हे. ते देशाचे नेते होते. देशाचं नेतृत्त्व कसं असाव हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता हा देश सर्वांचा आहे याचा वस्तुपाठ त्यांनी घालवून दिला. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे यावर भर देऊन राजकारण करणारे ते नेते होते. धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलं, असा चिमटा राऊत यांनी काढला
शिवसेना आणि भाजपची युती झाली. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं योगदान होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत. आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते, असंही ते म्हणाले.
काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवण्यासाठी वाजपेयींनी प्रयत्न केले. लाहोरला बस घेऊन गेले, मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली. मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी कारगील युद्धाचा मार्ग स्वीकारला, असं सांगतानाच अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत की त्यांचं स्मरण प्रत्येक जण करतो, असंही त्यांनी सांगितलं.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी लोकप्रिय नेते होते. पंडित नेहरु यांच्याकाळापासून अटलबिहारी वाजपेयी संसदेत होते. इंदिरा गांधी असो की राजीव गांधी… अटलबिहारी वाजपेयी या सर्वांचा सन्मान करत होते. अटलबिहारी वाजपेयी कोणत्याही एका पक्षाचे नेते नव्हते, ते देशाचे नेते होते. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्त्व केलं, असा टोलाही त्यांनी लगावला.
संबंधित बातम्या:
शंभर दीडशे नाही, पावणे दोनशे कोटी सापडले, नोटा मोजायलाही 13 मशिन्स, कानपूरच्या रेडमध्ये नवं ‘शिखर’!
बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेल्या नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक