छोटे घटक पक्ष महायुतीचा गेम करणार?, कुणाचा इशारा तर कुणाचा दम?; महायुतीत काय शिजतंय?
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने भाजपने या निवडणुका जिंकण्यासाठी जोरात तयारी सुरू केली आहे. भाजपने घटक पक्षांना सोबत घेऊन रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण घटक पक्षांच्या मनात मात्र काही वेगळंच शिजत आहे. घटक पक्षांनीही भाजपला इशारे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीत काहीच अलबेल नसून घटक पक्ष महायुतीचा कधीही गेम करू शकतात अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई | 15 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीची महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने तर लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी खास रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून सर्व छोट्या घटक पक्षांसोबत बैठका घेणं सुरू केलं आहे. या पक्षांना सोबत घेऊनच भाजपला प्रचाराचं रान उठवायचं आहे. मात्र, असं असलं तरी आम्ही फक्त संगतीला आहोत, पंगतीला का नाही? आम्ही काय फक्त बँडवाले आहोत काय? असं म्हणत महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपला सुनावलं आहे. काही घटक पक्षांनी तर थेट भाजपकडे लोकसभेच्या जागांचीच मागणी केली आहे. त्यामुळे हे छोटे घटक पक्ष ऐनवेळी महायुतीचा गेम करणार का? अशी चर्चा सुरू आहे.
महायुतीत एकूण 15 हून अधिक राजकीय पक्ष आहेत. त्यात भाजप, अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे गट हे तीनच मुख्य पक्ष आहेत. इतर छोटे पक्ष आहेत. त्यातील अनेक पक्षाचे आमदारही आहेत. यातील काहींनी तर लोकसभेची निवडणूकही लढवली आहे. त्यामुळे आता पक्षांनी इशारे आणि दमबाजी करण्यास सुरुवात केली आहे. आम्हालाही लोकसभेची तिकीट द्या, नाही तर आम्ही निघालो, असा इशाराच या छोट्या पक्षांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीची विशेषत: भाजपची चिंता अधिकच वाढली आहे.
जानकर यांचा इशारा काय?
महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते आहेत. ते भाजपच्या महायुतीत आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना महायुतीत आणलं. पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कर्नाटकातील मराठी बहुल परिसरात जानकर यांचं चांगलं वर्चस्व आहे. त्यांच्या पक्षाचा एक आमदार आहे. त्यांनी स्वत: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून अधिक मते घेतली होती. आता त्यांनी भाजपला इशारा दिला आहे. आम्ही महाविकास आघाडीला तीन तर महायुतीला लोकसभेच्या दोन जागा मागितल्या आहेत. महाविकास आघाडीने आम्हाला जागा दिल्या तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचाही विचार करू, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. जानकर यांनी सर्व दरवाजे मोकळे ठेवून महायुतीला टेन्शन देण्याचं काम केलं आहे.
तर गेम करू, बच्चू कडू बिनधास्त बोलले
आमदार बच्चू कडू हे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाची ताकद विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आहे. बच्चू कडू सतत कोणत्या ना कोणत्या आंदोलनामुळे चर्चेत असतात. राज्यातील दिव्यांगांचे आधारस्तंभ म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मंत्रिपदावर पाणी सोडून केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून ते शिंदे यांच्या बंडात सामील झाले. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर मंत्रीपद मिळेल असं बच्चू कडू यांना वाटत होतं.
पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बच्चू कडू हे अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता त्यांनी व्यक्तही केली आहे. आमची भूमिका तटस्थ आहे. आम्ही महायुतीच्या कोणत्याही मेळाव्याला जाणार नाही. फक्त लोकसभा निवडणुकीची तयारी करू नका. विधानसभेचाही निर्णय घ्या. भाजपला जेवढी लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे, तेवढीच आम्हाला विधानसभेची आहे. त्यामुळेच आम्ही तटस्थ आहोत. आम्ही वाट पाहू. त्यांच्यासोबत मिटिंग करू, नाही झालं तर गेम करू, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते : खोत
घटक पक्ष म्हणजे बँड वाला नाही. लग्न समारंभ आला की वाजवायला या. घटक पक्षाला सन्मान द्या. मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते हे लक्षात ठेवा, असा इशाराच माजी कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला दिला. सरकार आल्यानंतर घटक पक्षाला सन्मान दिला गेला नाही. तो सन्मान द्या. घटक पक्ष आला की हसू नका. अशी खंत व्यक्त करत मुंगी सुद्धा हत्तीला पराभूत करू शकते, असा इशाराच त्यांनी दिला.
आम्ही बँडवाले आहे काय?
सगळ्यांना खऱ्या अर्थानं तुम्हाला बरोबर घेऊन जावे लागेल. कारण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. भाजप आणि शिवसेना मोठे पक्ष आहेत. छोटे घटक पक्ष बाजूला गेले नाहीत. त्यावेळी विरोधक सत्तेत होते. त्यावेळी आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करत होतो. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितले की, आता तुम्ही कामाला लागा. पण हा लग्नाचा सीजन आहे का? का आम्ही बँडवाले आहे का? वेळ आली की वाजवायला यायचे? असे करू नका आम्हाला ही सन्मान द्या, असंही ते म्हणाले.