‘रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार त्यांच्यावर फिदा’, ‘वर्षा’वर खलबतं सुरु होण्याआधी बच्चू कडूंचं विधान
"रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही", असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
!['रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार त्यांच्यावर फिदा', 'वर्षा'वर खलबतं सुरु होण्याआधी बच्चू कडूंचं विधान 'रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार त्यांच्यावर फिदा', 'वर्षा'वर खलबतं सुरु होण्याआधी बच्चू कडूंचं विधान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/10/31052002/bachchu-kadu-1.jpg?w=1280)
मुंबई : आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. हा वाद विकोपाला जाताना बघून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगला या शासकीय निवासस्थानी रवी राणा आणि बच्चू कडू दाखल झाले आहेत. दोघांना समोरासमोर बसून या वादावर तोडगा काढण्याचा शिंदे-फडणवीस यांचे प्रयत्न आहेत. बच्चू कडू बर्षा बंगल्याबाहेर बैठकीसाठी दाखल झाले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. दरम्यान, “रवी राणा यांच्यामुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही”, असं विधान त्यांनी यावेळी केलं.
“आता आम्ही चर्चेला बसणार आहोत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. चर्चा काय होते, समाधान काय होतं, त्यावर पुढचं ठरवलं जाईल. आमच्यावर जे आरोप झाले ते अतिशय गलिच्छ आणि खालच्या स्थराचे झाले आहेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर आपण पुढचा निर्णय जाहीर करु”, असं बच्चू कडू म्हणाले.
“रवी राणा हे सुद्धा या बैठकीत असणार आहेत. त्यामुळे तिथे बैठकीत सर्वांसमोरच ही बैठक होणार आहे. चर्चा पाहू. रवी राणा यांनी इतकी मोठी बदनामी केलीय तर त्यांना माफी मागावीच”, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
“1 तारखेला आंदोलन होणार आहे. तोडगा निघाला नाही तरी आंदोलन होईलच. कार्यकर्ते ऐकत नाहीय. ते यायचंच म्हणत आहेत. त्यामुळे ते आल्यानंतर निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.
“कार्यकर्त्यांचा मेसेज येतोय. तुमचा अपमानच होत असेल, तुम्ही एवढी बदनामी सहन केली, सत्ताधारीच अशाप्रकारे बदनामी करत असतील तर कशाला त्यांच्यासोबत राहायचं? असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे. त्याचं म्हणणं काही वाईट नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“राणांमुळे एवढी बदनामी झाली तरी सरकार का फिदा आहे ते माहिती नाही”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.