आरोग्य व्यवस्था सलाईनवर, सफाई कामगार काढतात रुग्णांची सलाईन, करतात ड्रेसिंग
badlapur government hospital: रुग्णालयातील या प्रकारासंदर्भात रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी महिला परिचारिका नसल्याची कबुली दिली. तसेच रुग्णालयातील कर्मचारीवर्ग वाढवण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी नोंदवली असल्याचे सांगितले.
बदलापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विरोधकांकडून आंदोलन सुरु आहे. तसेच सरकारनेही या प्रकरणी ठोस पावले उचलली आहे. परंतु या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेची दुसरी बाजू समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे पीडित कुटुंबाला अनेक ठिकाणी फिरावे लागत आहेत. रुग्णालयात महिला परिचारिका नसल्यामुळे रुग्णालयातील सफाई कामगारच ड्रेसिंग करत आहेत. तसेच रुग्णाचे सलाईन काढण्याचे काम करत आहेत. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी सर्वात धक्कादायक प्रकार ‘टीव्ही ९ मराठी’ला दिसून आला.
‘टीव्ही ९ मराठी’ची टीम बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पोहचली. त्यावेळी धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दुरावस्थेची गंभीर परिस्थितीसमोर आली आहे. महिला नर्स नसल्यामुळे रुग्णालयातील सफाई कामगार गर्भवती महिलांना व इतर महिला रुग्णांना लावलेली सलाईन काढत आहेत.
अपूर्ण कर्मचारी वर्ग
बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण पाच डॉक्टर आणि सात परिचारिका आहेत. परंतु दोन परिचारिका अनुपस्थित होत्या. त्यामुळे पाच डॉक्टर आणि पाच परिचारिकांवर तीन शिफ्टमध्ये काम करावे लागत आहेत. रुग्णालयात महिला सिस्टर नसल्यामुळे सफाई कामगारच ड्रेसिंग व सलाईन काढण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी हा चिंताजनक प्रकार आहे.
रुग्णालयाचे कामसुद्धा अपूर्ण
बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात कर्जतपासून अंबरनाथपर्यंतचे रुग्ण येतात. या सर्वांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे आहे. या ठिकाणी 50 बेडची क्षमता आहे. या रुग्णालयाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या 30 बेडच रुग्णालयात आहे. यापेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात आल्यास त्यांच्यावर सध्या फ्लोअर बेडवर उपचार करण्यात येतात.
रुग्णालयातील या प्रकारासंदर्भात रुग्णालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी महिला परिचारिका नसल्याची कबुली दिली. तसेच रुग्णालयातील कर्मचारीवर्ग वाढवण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी नोंदवली आहे. तसेच तक्रारसुद्धा केली असल्याचे सांगितले.