मुंबईत बेकरीत गॅस गळतीनंतर आग भडकली, दोन मुलांसह सहाजण होरपळले; सर्वांची प्रकृती चिंताजनक
मुंबईतील खारदांडा येथे आज सकाळी गॅस गळती होऊन भीषण आग लागली. या आगीत सहाजण जखमी झाले आहेत. हे सहाही जण गंभीर जखमी आहेत. यात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. तर दोन सहा ते सात वर्षाच्या मुलांचा समावेश आहे.
मुंबई : मुंबईतील खारदांडा येथे आज अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. खारदांडा येथील एका बेकरीत गॅस गळती झाली. त्यामुळे आग भडकल्याने या आगीत सहाजण होरपळले आहेत. या सहाही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. या आगीमुळे बेकरीचं प्रचंड नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
खारदांडा येथील गोविंद पाटील मार्गावर हरिश्चंद्र बेकरी आहे. या बेकरीत सकाळी 9 च्या सुमारास गॅस गळती झाली. त्यानंतर आग पेटली आणि अवघ्या काही मिनिटातच आग भडकली. या आगीत बेकरीमधील सहाजण होरपळले आहेत. आग प्रचंड भीषण होती. आग लागताच चोहोबाजूने अग्नितांडव झाले. त्यामुळे आगीत अडकलेल्या या सहा जणांना आगीतून बाहेर पडणं मुश्किल झालं. त्यामुळे हे सहाही जण आगीत होरपळले. त्यांना तात्काळ वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या सहाही जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
सहा जणांची प्रकृती चिंताजनक
आगीची माहिती मिळताच बीएमसी, एमएफबी, पोलीस, अदानी आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केला. या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण आणलं आणि जखमींना तातडीने बेकरीतून बाहेर काढत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. या सहाही जणांच्या चेहरा, पोट आणि पाठीवर प्रचंड जखमा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तसेच आणखी कोणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले नाही ना? याची खातरजमा अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
सर्वजण अतिदक्षता विभागात
या आगीत होरपळलेल्या सर्व जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व जण ६ ते ६५ वर्षाचे आहेत. हे सर्वजण 40 ते 51 टक्के भाजले आहेत. जखमींमध्ये तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. सखूबाई जयस्वाल या 65 वर्षाच्या आहेत. त्या 45 टक्के भाजल्या आहेत. प्रियंका जयस्वार ही 26 वर्षाची असून 51 टक्के भाजली आहे. तर निकीता मंडलिक ही 26 वर्षाची तरुणीही 45 टक्के भाजली आहे. पुरुषांमध्ये सुनील जयस्वाल हे 29 लर्षाचे असून 50 टक्के, यश चव्हाण हा सात वर्षाचा मुलगा 40 टक्के आणि प्रथम जयस्वाल हा 6 वर्षाचा मुलगा 45 टक्के भाजला आहे.