मुंबई: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (brijbhushan singh) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी अयोध्येत येऊन दाखवावेच. त्यांना आम्ही अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मनसेनेच हा संभ्रम दूर केला आहे. कुणी कितीही टोकाची भूमिका घेतली तरी घेऊ द्या. टोकाची भूमिका आम्हालाही घेता येते. एकाने गाय मारली म्हणून वासरू मारायचे नसते, असं सांगत आमचा अयोध्या दौरा ठरलेला आहे. राज ठाकरे यांनी दौऱ्याची आधीच घोषणा केली आहे. आमची तयारीही सुरू आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येला जाणारच, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी मनसेचे नेते आणि प्रवक्त्यांची बैठक पार पडली. त्यानंतर मीडियाशी बोलताना नांदगावकर यांनी मनसे अयोध्या दौऱ्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं.
आज महत्त्वाची बैठक होती. सर्व प्रवक्ते आणि नेत्यांना बैठकीला बोलावलं होतं. गेल्या काही दिवसात आमच्या तीन सभा झाल्या. राज्यातील वातावरण ढवळून निघालं. त्यावर या बैठकीत चर्चा झाली. अयोध्या दौऱ्यावरही या बैठकीत चर्चा झाली. पुन्हा एकदा बैठक होणार आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची भूमिका ठाम असली तरी साहेबांनी दौरा जाहीर केला आहे. त्यावर चर्चा केली. बृजभूषण सिंह हे खासदार आहेत. ते त्यांची भावना व्यक्त करत आहेत. त्यावर राज ठाकरेच बोलतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
बृजभूषण सिंह एकटेच बोलत आहेत. ते बोलतात म्हणजे संपूर्ण उत्तर प्रदेश बोलतंय असं नाही. त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली आहे. पण आमचा अयोध्येला जाण्याचा निर्णय झाला आहे. बुकींग वगैरे झालं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारची जनता आमच्या स्वागताला तयार आहे. खासदाराला काय वाटते हे त्यांना माहीत. टीकाटिप्पणी करणं योग्य नाही. त्यातून तेढ निर्माण करणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
विरोध करायचा की नाही नंतरचा प्रश्न आहे. आमचं जायचं निश्चित झालं आहे. 5 तारीख ठरली आहे. लोकांशी बोलतोय सेक्युरिटीची व्यवस्था आहे. या सर्वांची सांगोपांग चर्चा झाल्यावर निर्णय घेऊ. टोकाची भाषा आम्हाला बोलता येते. पण टोकाची भाषा कधी बोलायची असते त्याचा विचार करावा लागतो. कुणाला फायदा, तोटा होणार असेल तर भूमिका घ्यावी लागते. त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही ना. त्याचा विचार करावा लागतो, असंही त्यांनी सांगितलं.
बृजभूषण सिंह यांना भाजप समज का देत नाही? असा सवाल केला असता, समज द्यावी, न द्यावी हा भाजपचा विषय आहे. पण आम्ही हिंदुत्व, भोंगे आणि हनुमान चालिसाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर आता सर्व जागे झाले आहेत. हनुमान चालिसा म्हणत आहेत. भगवा झेंडा घेऊन जात आहेत. नाना पटोले आयोध्येला जात आहेत. आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. काही लोक मंदिरात जात आहेत. तर काही लोक हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
उत्तर प्रदेशात असली नकलीचे पोस्टर लागले आहेत. त्यावरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पोस्टर कोण लावतो? कशासाठी लावतो? माहीत नाही. पण त्यांना सांगावं लागत आहे. असली कोण आणि नकली कोण याचा निर्णय जनता घेईल. त्यावर काळ उत्तर देईल. उत्तरभारतातील लोक राज ठाकरेंचं स्वागत करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.