Big Breaking : तुरुंगात जायची तयारी ठेवा, मल्लिकार्जुन खरगे यांचं मोठं विधान; इंडिया आघाडीच्या बैठकीतील इन्साईड स्टोरी काय?
केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शनसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यावर त्यावर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू आहे. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे प्रमुख आणि काही राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर झाल्या आहेत. इंडिया आघाडीच्या या तिसऱ्या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, ही बैठक सुरु होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्वच नेत्यांना उद्देशून तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे. आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे आपल्यामागे कोणतेही बालंट लावलं जाईल. आपल्याला त्रास देऊन तुरुंगात टाकलं जाईल. आपली शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे डगमगू नका. तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संजय राऊत यांचा हल्लाबोल
दरम्यान, केंद्र सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. मात्र, विरोधकांनी वन नेशन वन इलेक्शन हे एक षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल भाजपाने वन नेशन वन इलेक्शनचा फुगा सोडला आहे. निडणूक आयोग भ्रष्ट आहे. इंडिया आघाडीला केंद्र सरकार घाबरले आहे. त्यामुळेच आमच्या बैठकीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची टूम काढली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
विरोधकांशी बोलायला हवं होतं
यावेळी समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांना संसदेचं अधिवेशन बोलवायचं होतं तर त्यांनी विरोधी पक्षांशी बोलायला हवं होतं. अधिवेशन कशासाठी बोलावलं माहीत नाही. त्यांचा अजेंडा काय माहीत नाही, असं खासदार राम गोपाल यादव म्हणाले. तर इंडिया आघाडीला घाबरून भाजपने हा डाव टाकला आहे, असं जनता दल युनायटेडचे नीरज कुमार म्हणाले. तर, एक देश एक निवडणूक शक्यच नाही, अशी प्रतिक्रिया राजद नेते मृत्यूंजय तिवारी म्हणाले.
आम्ही तयार आहोत
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्याकडे मोहब्बतची दुकान आहे. आम्ही जिंकणारच. लोकांचं पाठबळ आमच्यापाठी आहे. केंद्रात जे काही होत आहे, त्यामुळे लोक त्रस्त आहेत. वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुका कधीही घ्या. आम्ही तयार आहोत, असं अशोक चव्हाण यांनी ठणकावलं आहे.