Uddhav Thackeray | दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार? दोन दिवसात मोठ्या घडामोडी?
Uddhav Thackeray | वरळीचा एक मोठा आमदार नाराज असल्याची माहिती. ठाकरे गटाच्या तीन मोठ्या नेत्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरे गटाला झटका बसणार का?
मुंबई (गिरीश गायकवाड) : राज्यातील सत्ता गेल्यापासून गळती लागलेल्या उद्धव ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्वस्थतता वाढली आहे. मागच्यावर्षभरात अनेक शिवसैनिक, माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटाची वाट धरली आहे. पुन्हा एकदा असं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा काही दिवसांवर आला आहे. त्याआधी मोठे राजकीय फटाके फुटू शकतात. दरवर्षी नवरात्रौत्सवाच्या दिवसात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा असते. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. मागच्यावर्षी शिवसेनेत बंड झालं, तेव्हापासून शिवसेनेचे दोन दसरा मेळावे सुरु आहे. यंदाही उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होईल, तर शिंदे गटाचा मेळावा सुद्धा दक्षिण मुंबईतील मैदानातच होईल. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे गटाला काही राजकीय झटके बसू शकतात. ठाकरे गटाला लागलेली गळती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार केला.
मात्र या विस्तारावर पक्षात नाराजीचा सूर आहे. वरळीचे आमदार सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, यांच्यासह इतर जुने शिवसैनिक नाराज असल्याची माहिती आहे. आपली नाराजी त्यांनी पक्ष प्रमुखांकडे जाहीर केल्याची माहिती आहे. दोन दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काल रात्री ठाकरे गटाच्या तीन मोठ्या नेत्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांशी चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे नाराज असलेले हे नेते शिंदे गटाची वाट धरणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करताना सहा नव्या नेत्यांची नियुक्ती केली. यात विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या सहा जणांना शिवसेना नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. वरळीत शिवसेनेचा बालेकिल्ला भक्कम करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका
याच विस्तारावर पक्षातील काही नेते नाराज आहेत. वरळीचे आमदार सुनील शिंदे हे वजनदार नेते आहेत. त्यांचा तगडा जनसंर्पक आहे. 2014 मध्ये ते वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नाही. पक्षाने नंतर त्यांना आणि वरळीमधीलच सचिन भाऊ अहिर असं दोघांना विधानपरिषदेवर निवडून आणलं. सुनील शिंदे आमदार बनण्याआधी अनेक वर्ष नगरसेवक होते. वरळीत शिवसेनेचा बालेकिल्ला भक्कम करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.