ओला-उबर विसरा आता, बेस्ट 12 डिसेंबरला आणतेय ही ‘प्रिमियम’ सेवा
मुंबई शहरातील सर्वाधिक जुन्या आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या बेस्टने कात टाकायचा निर्णय घेतला आहे. बेस्ट ओला-उबर धर्तीच्या नव्या 'प्रिमियम' सेवेचे सुरूवात 12 डिसेंबरपासून करीत आहे.
मुंबई : तुम्हाला जर रात्री अपरात्रीचा निर्धास्त प्रवास करायचा असेल तर ओला-उबरच्या ( ola-uber ) ड्रायव्हरचे प्रताप पाहून तुम्ही त्यांची निवड करण्याची शक्यता कमीच आहे. परंतू मुंबईची सेंकड लाईफ लाईन म्हटल्या जाणाऱ्या बेस्टने ( Best ) आता महिला तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना संपूर्ण सुरक्षित प्रवास करता येईल अशी प्रिमियम सेवा ( premium services ) आणली असून तिची निवड आता मुंबईकर बिनधास्त करु शकणार आहेत. कारण त्यात सेफ्टी फिचर्सचा भरमार आहे.
बेस्ट आता कात टाकत असून बेस्ट येत्या 12 डिसेंबरपासून आपली प्रिमियम सेवा लाँच करीत आहे. काय आहे ही प्रिमियम सेवा हे पाहूया. या बसेस सिटीफ्लाे धर्तीच्या वातानुकूलीत असल्या तरी बेस्ट त्यांच्या एक पाऊल पुढे म्हणजेच बेस्टच्या बसेस या ईलेक्ट्रीक असतील. विशेष म्हणजे या ‘प्रिमियम’ सेवेचे भाडे किलोमीटरला 4.5 रूपये इतके असणार आहे. आपल्या सर्व प्रिमियम शहर बस सेवा ईलेक्ट्रीक असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे.
बेस्टच्या नव्या प्रिमियम सेवेत प्रवाशांना चलो मोबाईल एपवरुन तिकीट आरक्षित करता येणार आहे. शिवाय या ‘चलो मोबाईल’ एपवरुन या बसला ट्रॅकही करण्याची सोय असणार आहे. या सेवेसाठी धुर आणि ध्वनी प्रदुषणमुक्त इलेक्ट्रीक बसचा वापर केला असल्याने प्रवाशांना अत्यंत आरामदायी सफर घडणार आहे. या बसेस प्रवाशांच्या सेवेत सोमवार 12 डिसेंबरपासून येत आहेत. या बसेसमध्ये आरामदायी आसने, मोबाईल चार्जिंगसह सर्व सुख सुविधा असणार आहेत.
बेस्टने आपल्या ओला-उबर धर्तीच्या या नव्या ‘प्रिमियम’ सेवेत महिला प्रवाशांसाठी खास सेफ्टी फिचर आणले आहे. यात महिला प्रवासी घरी सुखरूप पोहचेपर्यंत त्यांची सोबत बेस्टच्या काॅलसेंटरचे कर्मचारी ऑनलाईन करणार आहेत.
महिला प्रवाशांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर बस थांबा आणि घराचे अंतर गृहीत धरून अंदाजित वेळेत मॅसेज जाणार आहे. आणि जर ‘ओके’ असा रिप्लाय आला नाही, तर संबंधित प्रवाशाने संपर्कासाठी दिलेल्या जवळच्या व्यक्तीच्या फोन नंबरवर कॉल सेंटरमधून कॉल केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित व्यक्ती घरी पोहोचली का ? याची खातरजमा केली जाणार आहे. ही सुविधा केवळ महिलांसाठीच उपयुक्त नसून एकट्याने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठीही फायद्याची असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.
बेस्टने आपल्या नव्या ‘प्रिमियम लक्झरी’ सेवेसाठी खास बस डिझाईन केली आहे. या बसमध्ये उभे प्रवासी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच कोणत्याही स्टाॅपवरून तुम्ही बसमध्ये जागा आहे की नाही हे मोबाईलवर पाहून तिकीट बुक करू शकणार आहात. तुम्ही कुठल्या स्टॉपवर उभे आहात ते कंडक्टरला दिसेल आणि त्या स्टॉपवर तुम्हाला घेऊनच बस पुढील प्रवासाला रवाना होईल अशी सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत निर्माण करण्यात आली आहे. सुरूवातीला या बसेस ठाणे ते बीकेसी आणि वांद्रे ते बीकेसी अशा टप्प्यात चालविण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.
वेळापत्रक असे आहे…एक्सप्रेस रूट – ठाणे ते बीकेसी – दर अर्ध्या तासाने – स.7 आणि स. 8.30 तसेच बीकेसी ते ठाणे – सायं. 5.30 ते सायं. 7 तसेच ऑल डे रूट – बीकेसी ते वांद्रे स्थानक – स. 8.50 आणि सायं. 5.50 तसेच उलट दिशेला स.9.25 आणि सायं. 6.25