मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नावरून शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी जोरदार टीका केली आहे. 32 वर्षाच्या मुलाचं काय सांगायचं? आमच्यात एवढ्या वयापर्यंत कोणी थांबत नाही. 30 व्यावर्षीच आम्ही लग्न लावून देतो. आम्ही थांबत नाही. आता 32 वर्षे झालं तरी लग्न लागत नाही. तर काय बोलायचं त्याला? त्यावर न बोललेलं बरं. आदित्य ठाकरेंना शिंदे साहेबांना टक्कर देण्यासाठी बरीच वर्ष काढावी लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरळमार्गी आहेत. खोटं काही करत नाही. सदगुरुचं नामस्मरण करून चालले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांचा नाद कोणी करू नये. मग 32 वर्षाचा असो की 36 वर्षाचा असो. 30 वर्षाच्या आत सर्व काही व्यवस्थित व्हायला हवं होतं. पण आता होत नाही तर आम्हाला बघावं लागेल, अशी खरमरीत टीका भरत गोगावले यांनी केली.
ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावल्याचं भरत गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यापर्यंतचा आदेश दिला आहे. एक आठवडा उद्या संपतोय. एक आठवडा राहतोय. उद्यापासून अधिवेशनाला हजर राहावे, असा व्हीप आम्ही ठाकरे गटाच्या आमदारांना बजावला आहे. हा कारवाईचा व्हीप नाही. नियमाप्रमाणे व्हीप बजावला आहे. कारवाई म्हणून नाही. त्यामुळे कुणाला अडचण होणार नाही. दोन आठवड्यानंतर कोर्ट जो आदेश देईल. त्यानुसार निर्णय घेऊ, असं भरत गोगावले म्हणाले.
व्हीपचं पालन न केल्यास नियमाप्रमाणे कारवाई करू. आम्ही गद्दार असतो तर चिन्हं मिळालं नसतं. गद्दार असतो तर शिवसेना हे नाव मिळालं नसतं. आम्ही पक्षच सोडला नाही. एका घरात दोन पार्ट झाले. एका पार्टमध्ये आम्ही विजयी झालो. काय करायचं ते त्यांनी समजावं. योग्य वाटत असेल तर आमच्यासोबत राहावं, असंही ते म्हणाले.
शंभर टक्के कारवाई होईल. एक टक्काही कमी नाही. त्यांनी आता फुशारक्या मारू नये. त्यांनी रितसर चालावं. खाली बघून चालावं. नाही तर पायाला ठेच लागेल. त्यामुळे नेहमी लोकांनी बोलताना, चालताना जपून बोलावं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
2 तारखेला कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे. दोन्ही जागांवर पराभूत झाल्यातर राऊत काय करणार? सोनिया गांधी संन्यास घेणार असल्याचं कळतं. राऊतांनीही संन्यास घ्यावा. त्यामुळे ठाकरे गटाला स्थिरता येईल. नाही तर येणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.