तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल
कुणी तरी सांगितलं दोन बिस्किटं देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.
मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेचे आज सभागृहात प्रचंड पडसाद उमटले. कुणी तरी सांगितलं दोन बिस्किटं देतो. जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी नितेश राणेंना रोखलं का नाही? असा खडा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात येत असताना नितेश राणेंनी म्याव म्यावचा आवाज काढला होता. त्याचे आजही सभागृहात पडसाद उमटले. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फर्मेशनद्वारे नितेश राणे प्रकरणाकडे लक्ष वेधलं. त्यावर बोलताना भास्कर जाधव यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केला. मी अध्यक्षांची परवानगी घेतलीय मला पुरेपूर बोलू द्या. मागच्या अधिवेशनावेळी मी तालिका अध्यक्ष होतो. त्यावेळी फडणवीस साहेब तुम्ही विधान भवनाबाहेर अभिरुप विधानसभा भरवली. त्यावेळी हेच सदस्य अनेक वक्तव्य करत होते. युट्यूबवर क्लिप आहे. माझ्याकडे क्लिप आहे. याच संधीची गेले कित्येक दिवस मी वाट पाहत होतो. नितेश राणेंनी दादांना उद्देशून म्हटलं, दादा मी इथे असंसदीय शब्द बोलतो. भास्कर जाधव म्हणजे काय? त्याला कुणी तरी सांगितली दोन बिस्किटं देतो, जा त्याला चाऊन ये. त्याला चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव. असं नितेश राणे त्या क्लिपमध्ये बोलले. सुधीरभाऊ तुम्ही त्या क्लिपमध्ये दिसत नाहीत, असं भास्कर जाधव म्हणाले.
भाजप नेत्यांनी सवाल का केला नाही
मला फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि नानांना प्रश्न विचारायचा आहे. जर मला दोन बिस्किटं घालून मला कुणाला तरी चावायला सांगितलं आणि मी कुत्रा असेल तर मी असं म्हणणार नाही. त्याचवेळी नितेश राणेंना दादांनी विचारायला हवं होतं, जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार भांडत होते तेव्हा तात्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी 19 जणांना निलंबित केलं होतं. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मला किती बिस्किटं खायला घातली होती हे चंद्रकांतदादांनी नितेशला विचारायला हवं होतं. मी असं बोलणार नाही. मी नाही विचारणार. दादा, काळा याच्यामुळे सोकावला, असा घणाघातही त्यांनी केला.
सभागृहाचे कामकाज तहकूब
यावेळी भास्कर जाधव हातावर हात मारून जोरजोरात आपलं म्हणणं मांडत होते. त्याचवेळी विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सत्ताधारी सदस्यांनीही जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. हा गोंधळ अधिकच वाढल्याने अखेर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटासाठी तहकूब करण्यात आले.
संबंधित बातम्या:
बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है; नवाब मलिक यांची कालीचरण महाराजांवर टीका