काँग्रेसला मोठा झटका, संजय निरुपम या पक्षात प्रवेश करणार?
काँग्रेसला मुंबईत मोठा झटका लागणार आहे. कारण संजय निरुपम यांनी आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संजय निरुपम यांनी कालच आपल्यासाठी पर्याय खुले असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Sanjay Nirupam : लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. कारण काँग्रेस नेते संजय निरुपम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. संजय निरुपम हे काँग्रेसवर नाराज आहेत. महाविकासआघाडीत जागा वाटपावरुन अजून मतभेद असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केल्याने महाविकास आघाडीत चुरस सुरू झाली आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षाला अल्टिमेटम दिला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली होती.
संजय निरुपम सोडणार काँग्रेस?
संजय निरुपम हे आधी शिवसेनेतच होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे ते आता शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याआधी माध्यमांशी बोलताना संजय निरुपम म्हणाले होते की, माझ्याकडे पर्यायांची कमतरता नाही. मी आठवडाभर वाट बघेन आणि मग निर्णय घेईन. उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. मी खिचडी चोरचा प्रचार करणार नाही. असे ते म्हणाले होते. काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळी पडली आहे, पण मी हे मान्य करणार नाही. अशा शब्दात त्यांनी इशारा दिला होता.
हायकमांडला थेट आव्हान
संजय निरुपम यांनी थेट हायकमांडला खुले आव्हान दिले होते. संजय निरुपम म्हणाले की, या जागेवरून ज्या उमेदवाराला उभे केले आहे, त्यांच्यावर कार्यकर्त्यांची खिचडीही चोरल्याचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आता बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी तिकीट वाटपावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला असून त्यांच्याच पक्षावरही निशाणा साधला आहे.
संजय निरुपम हे याआधीही खासदार म्हणून निवडून आले आहेत. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केल्याने ठाकरे गटाने काँग्रेसला आव्हान दिले आहे, जे जागावाटपाच्या चर्चेला तयार नाहीत. ठाकरे गट तितका ताकदवर नाही असं निरुमप म्हणाले आहेत.