राज्यात कोंबड्यांची ‘लपवाछपवी’, तुमच्या जीवावर पडेल भारी, धाब्यावर ताव मारताना घ्या काळजी
Bird Flu Alert : राज्यात बर्ड फ्लूने चांगलेच हातपाय पसरले आहेत. उभ्या-आडव्या महाराष्ट्रात कुठे न कुठे बर्ड फ्लूच्या घटना समोर येत आहे. कावळ्यांसोबतच अनेक कोंबड्यांना त्याची लागण झाली आहे. तेव्हा धाब्यावर जेवताना काळजी जरूर घ्या...

राज्यात अनेक भागातील शेतकरी आणि कुक्कुटपालन व्यावसायिक सध्या धास्तावले आहेत. विविध भागात बर्ड फ्लूने हातपाय पसरले आहेत. ठाण्यापासून ते चंद्रपूरपर्यंत काही जिल्ह्यात या रोगाने कहर केला आहे. त्यातच राज्यात कोंबड्या लपवण्याचा ‘रोग’ वाढल्याने पशूसंवर्धन विभाग हैराण झाला आहे. Bird Flu च्या संकटाने ग्रामीण भागात इरसाल खेळ सुरू असून काही जण कोंबड्या लपवत असल्याने धोका वाढला आहे. असे प्रकार थांबवण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केला आहे. त्यामुळे धाब्यावर यथेच्छ मांसाहार झोडण्याचा बेत असेल तर काळजी घ्या.
राज्यात बर्ड फ्ल्यूचा कहर
राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं गेल्या महिन्यात अचानक दगावली होती. अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबडीची पिल्लं मेली होती. तर त्यापूर्वी उदगीर शहरात 60 कावळ्यांचा मृत्यूची घटना समोर आली होती. बर्ड फ्लूमुळेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात आले होते. तर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरी तालु्क्यामधील मंगळी गावतील पोल्ट्री फॉर्मवर काही कोंबड्या दगावल्या होत्या.




वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा (जिरापुरे) येथील पोल्ट्री फार्ममधील ८ हजार कोंबड्यांपैकी ६ हजार ८३१ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. राज्यात ठाणे, उस्मानाबाद, लातूर, चंद्रपूर, वाशीमसह इतर जिल्ह्यात पण ही प्रकरणं समोर आल्याने पशूसंवर्धन विभागाची झोप उडाली आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला आहे. बर्ड फ्ल्यूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ढोकी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. त्यानंतर तीन किलोमीटर परिसरातील कोंबड्याचे सॅम्पल घेतले जाणार आहेत. जलद कृती दलाच्या माध्यमातून कोंबड्या नष्ट करायला सुरुवात केली आहे.
लपवाछपवीमुळे पशूसंवर्धन विभाग हैराण
दरम्यान कोंबड्यांना बर्ड फ्लूचा धोका वाढलेला असतानाच ग्रामीण भागात कोंबड्या लपवण्याचे प्रकार वाढले आहेत. कोंबड्या नष्ट करण्याची मोहिम हाती घेतल्यापासून एकच खळबळ उडाली आहे. आपले नुकसान होईल या भीतीने काही जण या कोंबड्या लपवून ठेवत आहेत. अथवा या कोंबड्या काही काळासाठी नातेवाईक, मित्रांच्या शेतावर लपवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. पण या प्रकरामुळे बर्ड फ्लूची लागण वाढण्याची भीती वाढली आहे.
अशा घटना सातत्याने वाढत असल्याने कोंबड्या लपवून ठेवू नका किंवा नातेवाईकांना देऊ नका नष्ट करायला मदत करा, असे आवाहन पशूसंवर्धन विभागाने केले आहे. कोंबड्याना संसर्ग आढळून आल्याने अनेक गावात मांस विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.