Satyajeet Tambe : ‘नवीन मित्र आमच्यासोबत जोडला जाणार’, भाजपच्या बड्या नेत्याचं सूचक विधान
भाजपचा अमरावती पदवीधर मतदारसंघात अतिशय कमी फरकाने पराभव झालाय. याशिवाय नागपूर हा भाजपचा होमपिच आहे. पण तिथेही महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली आहे.
मुंबई : विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाचा संपूर्ण निकाल (MLC election result) अखेर जाहीर झालाय. या निवडणुकीत तीन जागांवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवारांनी बाजी मारलीय. एका ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet tambe) यांचा विजय झाला. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. भाजपचा अमरावती पदवीधर मतदारसंघात अतिशय कमी फरकाने पराभव झालाय. याशिवाय नागपूर हा भाजपचा होमपिच आहे. पण तिथेही महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली आहे. या पराभवाबद्दल भाजपचे बडे नेते आशिष शेलार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सत्यजीत तांबे यांच्याबद्दल अतिशय सूचक अशी प्रतिक्रिया दिली.
आम्ही दोन जागा गमावलेल्या आहेत. पण नवी जागादेखील मिळवली आहे. तसेच नवा मित्रदेखील जोडला जाणार असल्याचं सूचक विधान आशिष शेलार यांनी केलंय. आशिष शेलार हे भाजपचे बडे नेते आहेत. त्यांच्यावर आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुकीची धुरा असणार आहे. त्यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. त्यामुळे त्यांनी सत्यजीत तांबे यांच्याबद्दल केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जातंय.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
“खरंय आम्ही दोन जागा गमावल्या आहेत. एक नव्याने जागा मिळवली आहे. आणि एक नवीन मित्र नव्याने जोडलाय किंवा जोडला जाईल. पण या परिस्थितीत ज्या दोन जागा केल्या त्याचंस चिंतन केलं पाहिजे, असं माझं मत आहे. महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील”, असं आशिष शेलार म्हणाले.
काँग्रेस सत्यजीत तांबे यांना पुन्हा पक्षात घेणार?
दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सत्यजीत तांबे यांच्यावरील निलंबन मागे घेणार का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारला असता त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं.
“मी कालही सांगितलं, याविषयाचा निर्णय हायकमांडच घेईल. त्यांचं निलंबन हे हायकमांडच्या स्तरावर झालेलं आहे. मी कालही हे सांगितलं आहे. त्यामुळे हायकमांडच्या निर्णयावर बोलणं बरोबर ठरणार नाही”, अशी स्पष्ट प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
“काल आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. त्यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला”, असं ते म्हणाले.
“ज्यावेळेस मतदान झालं, त्यावेळी तातडीने त्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर त्यांचे नेते असतील त्यांनी जाहीरपणे सांगितलं की, आम्ही सत्यजित तांबे यांना निवडून देणार आहोत. डॉ. सुधीर तांबे काही बोलले नाहीत. पण भाजपचेच लोकं बोलले की ते निवडून येतील”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
“ज्या पद्धतीने चाललं होतं, देवेंद्र फडणवीस सत्यजित तांबे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत होते. दुसऱ्याच्या घरात आग लावणं सोपं आहे. आता विदर्भात त्यांच्या घरात आग लागली. त्याचं काय? त्याचं उत्तर ते देणार आहेत का?”, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.