MLC Election 2022: लाड यांच्यासहीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी होणार?, भाजपचा कोटा किती?; रणनीती काय?
MLC Election 2022: अतिरिक्त उमेदवार उतरल्याने भाजपला अजून 22 मतांची गरज आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मते पडल्यास भाजपला 19 मतांची गरज भासणार आहे.
मुंबई:राज्यसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजपने विधान परिषद निवडणुकीतही (MLC Election 2022) तीच रणनीती आखली आहे. भाजपने (bjp) विधान परिषद निवडणुकीत 29 मतांचा कोटा ठेवला होता. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 26 मते आवश्यक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने 29 मतांचा कोटा ठरवला होता. आपले पाचही उमेदवार निवडून आणण्यासाठी यामागची खेळी होती. त्यामुळे भाजपची ही रणनीती यशस्वी होते का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या रणनीतीनुसार पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाडही (prasad lad) विजयी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अवघ्या काही तासात मतमोजणी होणार असून त्यातून सर्व काही स्पष्ट होणार आहे. भाजपची ही रणनीती किती यशस्वी ठरली हे सुद्धा अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि सिनेटच्या निवडणुकीप्रमाणेच विधान परिषदेची निवडणूक पार पडते. या निवडणुकीत पसंतीक्रमाची पद्धत वापरली जाते. म्हणजे निवडणुकीत जेवढे उमेदवार आहेत, तेवढ्यांना पसंती क्रम दिला जातो. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून मतांचा कोटाही ठरवला जातो. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने विजयासाठी 26 मतांचा कोटा ठरवला होता. आयोगाने ठरवलेल्या कोट्याची पहिल्या पसंतीची मते मिळवल्यास उमेदवार विजयी होतो.
भाजपचा कोटा 29 मतांचा
निवडणूक आयोगाने विजयासाठी 26 मतांचा कोटा ठरवला असला तरी भाजपने मात्र, 30 मतांचा कोटा ठरवला असल्याची चर्चा होती. नंतर भाजपने 29 मतांचा कोटा ठरवल्याची बातमी आली. मात्र आम्ही कोटा 30 मतांचा कोटा ठरवलाच नसल्याचं सांगून भाजपने या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. भाजपने एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या उमेदवारांसाठी भाजपने 29 मतांचा कोटा ठरवला आहे. भाजपकडे 106 मते आहेत. सहा अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपकडे 112 मते आहेत. त्यामुळे 112 मते आणि 29 मतांचा कोटा ठरवताना पाचही उमेदवार कसे निवडून येतील याची खबरदारी भाजने घेतली आहे. मात्र, भाजपची नेमकी रणनीती काय होती? हे भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. प्रत्यक्ष निकालानंतरच आकडेवारीवरून भाजपच्या रणनीतीचा अंदाज बांधता येणार आहे.
अशी ठरली रणनीती
प्रसाद लाड यांना विजयी करण्यासाठी भाजपने विशेष मेहनत घेतली आहे. अतिरिक्त उमेदवार उतरल्याने भाजपला अजून 22 मतांची गरज आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मते पडल्यास भाजपला 19 मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे या 19 मतांची बेगमी भाजपने कशी केली हे प्रत्यक्षात निकालातूनच दिसणार आहे. तसेच या 19 मतांची गरज भाजपच्या कोणत्या उमेदवाराला गरज होती हे सुद्धा प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच दिसून येणार आहे.