शिवीगाळ, विनयभंगाबाबत चौकशी करा, यशवंत जाधवांच्या भाडोत्री गुंडावर गुन्हा नोंदवा; भाजप नगरसेविकांची मागणी
शिवीगाळ व विनयभंगाबाबत सखोल चौकशी करून संबंधित भाडोत्री गुंडावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्ष नगरसेविका शिष्टमंडळाने मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था, सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली.
मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात होरपळलेल्या चिमुकल्याचा नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला. शुक्रवारी झालेल्या महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारला असता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेरील रस्त्यावर भाडोत्री गुंडांनी भाजपाच्या महिला नगरसेविकांना केलेल्या धक्काबुक्की केली, असा आरोप भाजपच्या नगरसेविकांनी केला आहे. तसेच शिवीगाळ व विनयभंगाबाबत सखोल चौकशी करून संबंधित भाडोत्री गुंडावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्ष नगरसेविका शिष्टमंडळाने मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था, सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली.
गुंड प्रवृत्तीच्या शेकडो लोकांना बोलविले
काल शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये वादग्रस्त व बेताल विधाने स्थायी समिती अध्यक्ष, भायखळ्याचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी केले. केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी भाजपाच्या महिला नगरसेविकांनी लावून धरली. याचाच राग मनात ठेवून यशवंत जाधव यांनी बदला घेण्यासाठी कटकारस्थान करुन सभागृहाबाहेर स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या शेकडो लोकांना बोलविले.
भाडोत्री गुंडांनी शारीरिक विनयभंगाचाही प्रयत्न केला
तसेच रात्री 9 वाजता सभागृह संपल्यानंतर भाजपा नगरसेविका घरी जात असताना सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर या भाडोत्री गुंडांनी व शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच पुरूष भाडोत्री गुंडांनी शारीरिक विनयभंगाचाही प्रयत्न केला. याचे व्हिडीओ शुटिंगही उपलबध आहे आणि सीसीटीव्ही फुटेजही महापालिकेत उपलब्ध होऊ शकेल, असे भाजप नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
भाडोत्री गुंडांवर गुन्हा दाखल करावा
ही बाब अत्यंत गंभीर असून या घटनेमुळे मुंबई शहरात महिला नगरसेविकासुध्दा सुरक्षित नाहीत हे सिद्ध होते. याबाबत आपण भा.दं.संहितेप्रमाणे या भाडोत्री गुंडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, समीता कांबळे, शीतल गंभीर, नेहल शाह, सारिका पवार, योगिता कोळी, जागृती पाटील, हेतल गाला, रेणू हंसराज, स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे आदी नगरसेवक उपस्थित होते.
इतर बातम्या :