चार वेळा खासदार, वडिलांऐवजी मुलाला उमेदवारी, भाजपचं महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात धक्कातंत्र
भाजपकडून महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीच्या माध्यमातून भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं बघायला मिळत आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विद्यमान 4 खासदारांचं तिकीट कापलं आहे. तर अकोला मतदारसंघात ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी न देता त्यांच्या चिरंजीवाला उमेदवारी दिली आहे.
मुंबई | 13 मार्च 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण भाजपकडून महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीच्या माध्यमातून भाजपने धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं बघायला मिळत आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विद्यमान 4 खासदारांचं तिकीट कापलं आहे. यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगावचे खासदार उन्मेश पाटील आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा समावेश आहे. गोपाळ शेट्टी यांच्याजागी पियूष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. तर उन्मेश पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा आणि प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून अकोल्यातही मोठी राजकीय खेळी करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. भाजपने इथे धक्कातंत्राचा अवलंब केला आहे.
अकोल्यात गेल्या 20 वर्षांपासून खासदार असलेले भाजप नेते संजय धोत्रे यांचं तिकीट भाजपने कापलं आहे. संजय धोत्रे हे भाजपचे दिग्गज नेते आहेत. ते 1999 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2004 पासून होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते सातत्याने खासदार म्हणून निवडून येत आहेत. तसेच ते केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीदेखील आहेत. असं असताना भाजपने त्यांचं तिकीट कापलं आहे. पण तरीही भाजपने धोत्रे कुटुंबातच लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनूप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. ते पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
अनुप धोत्रे यांची पहिली प्रतिक्रिया
अनूप धोत्रे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. उमेदवारी अपेक्षित नव्हती. पण पक्षाने पूर्ण मतदारसंघातील लोकांपर्यंत संपर्क साधण्याचा आदेश दिला होता. तो मी पार पाळला. त्यामुळे थोड्या अपेक्षा वाढल्या होत्या. महाराष्ट्रातील भाजपचे सर्व उमेदवार जिंकतील. यामध्ये अकोल्यातून आम्ही जिंकून येऊ, असा विश्वास अनूप धोत्रे यांनी व्यक्त केला.
अनुप धोत्रे यांनी पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून शिक्षण घेतलं आहे. अनुप धोत्रे यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. यामध्ये अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भू-विकास यांचा समावेश आहे. त्यांचे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चांगले संबंध आहेत. अकोल्यात त्यांची कार्यकर्त्यांमध्ये क्रेझ आहे.