एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार? पाहा चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे. शिंदे गटातही अनेक हालचाली घडत आहेत. असं असताना आता बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करताना शिंदे गटासोबत चर्चा करायला हवी होती, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबतच्या चर्चांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजप पक्ष म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं आहे. राज्यात 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. राज्यात संभ्रम निर्माण करण्याचं काम होत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत. तसेच शिंदे गटात कोणतही अस्वस्थता नाही, असंदेखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“2024 पर्यंत आज जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच कुठे येतो? या कपोल्कल्पित मुख्यमंत्री बदलण्याबद्दल आणि राज्यात संभ्रम निर्माण करण्याबद्दल जे वातावरण तयार करत आहेत, ते केवळ राज्यामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले
“काही अस्वस्थता निर्माण होणार नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ मुख्यमंत्री असतील तर अस्वस्थता निर्माण होण्याचा काही प्रश्नच येत नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
“अजित पवार यांनी भरपूर खुलासे केले आहेत. त्या खुलाशांचा विचार केला तर अजित पवार का बाहेर आले, आणि भाजपसोबत का आले? हेही तुम्हाला कळलं आहे”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तसेच “पक्ष सोडून जे लोकं आले आहेत हे त्यांच्याच वरिष्ठ नेत्यांकडून होत असलेल्या त्रासामुळे सोडून आले आहेत. आमच्यामुळे ते पक्ष सोडून आलेले नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
शिंदे गटाच्या गोटात घडामोडी वाढल्या
दरम्यान, अजित पवार यांची मंत्रिपदाची शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात हालचाली वाढल्या आहेत ही गोष्ट नाकारता येणार नाही. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अचानक आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. शिंदे गटाच्या कोअर कमिटीची काल बैठक पार पडलेली. त्यानंतर आजही एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडत आहे.