संजय गायकवाड यांच्याकडून थेट औकातीची भाषा, चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेला मोलाचा सल्ला
शिवसेनेच्या जाहिरातीवरुन युतीत खडा पडला आहे. भाजप नेते अनिल बोंडे यांनी केलेल्या खोचक टीकेवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट औकातीची भाषा केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने वाद वाढताना दिसतोय. या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला मोलाचा सल्ला दिला आहे.
मुंबई : शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजप आणि शिवसेनेत चांगलंच घमासान झालं. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तर भाजप नेत्यांवर टीका करताना थेट औकातीची भाषा केली. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांनी जाहिरातीवरुन सुरु झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेकडून आज जी जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्या जाहिरातीवर त्यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच शिवसेनेकडून करण्यात आलेल्या दुरुस्तीचं त्यांनी स्वागत केलं आहे. याबद्दल त्यांनी शिवसेनेचं अभिनंदन देखील केलंय. यावेळी त्यांनी शिवसेनेला एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
“एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा फोटो त्यांनी आज त्यांचा गट म्हणून छापला आहे. त्यामध्ये कोलीत लावणं योग्य नाहीय. असं कोलीत कुणीही लावू नका. त्यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाने दिलेली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्या मंत्र्यांकडून चांगल्या भावनेने नवी जाहिरात छापली आहे. खरंतर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खोडसाळपणा झाला होता, पण त्यांनी चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. हेच महाराष्ट्राला आणि युतीला अपेक्षित आहे. हेच सर्वांना अपेक्षित आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे यांचा शिवसेनेला नेमका सल्ला काय?
“आम्ही संतुष्ट किंवा असंतुष्ट कालही नव्हतो आणि आजही नाहीत. संतुष्ट-असंतुष्टाचा संबंधच येत नाही. काल जी जाहीरात आली त्यामध्ये काही खोडसाळपणा झाला होता, त्यांची भावना चुकीची नव्हती. त्यांनी आज तो खोडसाळपणा दुरुस्त केला आहे. त्यांनी आज चांगल्या पद्धतीने प्रेझेन्टेशन केलं आहे. त्यांनी खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्र आणि आमच्या युतीसाठी चांगलं आहे. हे आमच्या पक्षासाठी चांगलं आहे. त्यांच्याही पक्षासाठी चांगलं आहे. कुणीतरी लहान व्हावं, कुणीतरी मोठं व्हावं”, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
“आपण युतीत जेव्हा काम करतो तेव्हा आमच्याकडून काही चूक झाली तर ती आम्ही दुरुस्त केली पाहिजे. त्यांच्याकडून काही चूक झाली तर त्यांनी दुरुस्त केली पाहिजे. मला वाटतं आता हा विषय संपलेला आहे”, अशा शब्दांत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
‘जेव्हा नेतृत्वाला डॅमेज करणाऱ्या भूमिका येतात तेव्हा…’
“जेव्हा एखाद्या नेतृत्वाबद्दल त्यांना डॅमेज करणाऱ्या भूमिका येतात किंवा आमचं नेतृत्व कमी झालं, आमच्या नेत्याची लोकप्रियता कमी झालीय असं जाहिरातीतून करण्यात आलं. त्यामुळे साहजिकच त्या जाहिरातीतून कुणाचं मन दुखावलं जातं. त्यातून काही भावना निघतात. पण मी विषय संपलेला आहे, असं सांगितलं आहे”, असंदेखील ते म्हणाले.
“या राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. एकनाथ शिंदे हे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. ते मुख्य भूमिकेत एकनाथ शिंदे आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत. आमच्या 105 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. केंद्रीय नेतृत्वाने विश्वास ठेवला. एकनाथ शिंदे हेच आमचे सर्वांचे नेते असताना बच्चू कडू यांनी त्यांना चांगलं सांभाळा, त्यांना चांगलं वागवा असं म्हणणं, खरंतर मुख्य पदावर असलेल्यांची जबाबदारी असते. ते चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत. आम्हाला त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे सक्षम आहेत”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?
“मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा, कुणाला मंत्री म्हणून नेमायचं, कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचा हा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे भेटल्यानंतर त्यांना तुम्ही विचारा. शेवटी अधिकार त्यांचा आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.