‘योग्य वेळी…’, अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट... अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य
मुंबई | राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सामील झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सध्या सर्वत्र राज्याच्या राजकारणाविषयी चर्चा रंगत आहेत. अशात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील ट्विट करत मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत.
चित्रा वाघ यांनी अजित पवाय यांच्यासोबत अन्य मंत्र्यांचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, ‘योग्य वेळी योग्य निर्णय…’ शिवाय चित्रा वाघ यांनी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तडकरे यांना टॅग देखील केलं आहे. सध्या सर्वत्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.. चित्रा वाघ यांच्यासोबत अन्य दिग्गजांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू….’ शरद पवार यांच्या प्रतिक्रियेबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ?
रविवारी राज्याच्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
अजित पवार यांनी राज्यपालांना ३० आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत इतर नऊ आमदारांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवारांच्या बंडखोरीची जोरदार चर्चा होत आहे. राज्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे.