शिंदे गट आणि भाजपात ठिणगी, रामदास कदम यांच्या वक्तव्याला फडणवीसांचं सौम्य शब्दांत सडेतोड उत्तर
महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या पडद्यामागे जोरदार हालचाली घडत आहेत. विशेष म्हणजे भाजप लोकसभेच्या 48 पैकी तब्बल 36 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई | 7 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपावरुन आता वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं वक्तव्य केलं आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी फक्त 10 जागा दिल्या जाऊ शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समजूत काढल्याची माहिती समोर आली आहे. ज्या मतदारसंघावर ज्याचा खासदार तिथे त्याच पक्षाला उमेदवार, असा फॉर्म्युला महायुतीत ठरलेला नाही. तर सर्वेक्षणानुसार जो पक्ष जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवारी दिली जाईल, असा फॉर्म्युला महायुतीच्या जागावाटपात ठरल्याची चर्चा आहे. जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.
“शिवसेना नेते रामदास कदम यांना टोकानं बोलायची सवय आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “आम्ही 115 तरी आम्ही खऱ्या शिवसेनेच्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. रामदास कदम यांनी भाजपबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खडेबोल सुनावलं आहे. “भाजपने केसाने गळा कापू नये”, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून इथे जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद चाललं आहे. माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोकं आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. मोदी-शाह यांच्याबाबत संबंध वेगळा मेसेज आपण भाजपकडून देत आहात. याचं भानदेखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे”, असं रामदास कदम म्हणाले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मी इतके वर्ष रामदास भाईंना ओळखतो. अशाप्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांना सवय आहे. त्यांची टोकाने बोलण्याची सवय आहे. ते कधीकधी रागानेदेखील बोलतात. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केलाय. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, आम्ही 115 आहोत, तरीदेखील आमच्याबरोबर आलेल्या शिंदेना मुख्यमंत्री केलं. कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिलं.