महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी पैसे वाटण्यात आले? भाजपकडून धक्कादायक व्हिडीओ ट्विट
महाविकास आघाडीने आज मुंबईत मोठा मोर्चा काढला. पण या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेकांना पैसे देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय.
मुंबई : महाविकास आघाडीने आज मुंबईत मोठा मोर्चा काढला. पण या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेकांना पैसे देण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. विशेष म्हणजे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी पैसे वाटपाचा व्हिडीओ ट्विट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. “मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य. आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुद्धा अशा पद्धतीने”, असं केशव उपाध्याय यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे.
केशव उपाध्याय यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला या ट्विटबद्दल प्रतिक्रिया दिलीय. “हो मी ते ट्विट केलंय. त्याच पैसे वाटप होताना दिसत आहे. मी जागासुद्धा स्पष्ट केलीय. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटप केले जात होते”, असं केश उपाध्याय यांनी सांगितलं.
मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळ आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने…. pic.twitter.com/I7XvM6Wf0B
— Keshav Upadhye (@keshavupadhye) December 17, 2022
“काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर पैसे का वाटप केले जाते याचा अभ्यास केला पाहिजे. मोर्चाला जी काही लोकं आली होती ती असे पैसे वाटून आणली होती का? याचा खुलासा काँग्रेसने करावा”, असं केशव उपाध्याय म्हणाले.
केशव उपाध्याय यांनी नेमकं काय म्हटलं?
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते यांनी मोठा खटाटोप केला. सगळ्यांनी एकत्र येऊन आपण राज्याच्या राजधानीत काहीतरी वेगळं करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष मोर्चात फार तुरळक गर्दी होती. ती आपण सगळ्यांनी पाहिली. तसेच पैसे वाटून तुरळक गर्दी आणली असेल तर ते नैतिकतेच्या गोष्टी कशाच्या आधारावर मारतात?”, अशी टीका केशव उपाध्याय यांनी केली.