महायुतीत धुसफूस? मोहित कंबोज यांचं डिवचणारं ट्विट, प्रफुल्ल पटेल यांचं ताकद दाखवण्याचं वक्तव्य
सत्ताधारी पक्षांमध्ये सारं काही आलबेल आहे ना? अशा चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. या चर्चांना उधाण येण्यामागे भाजप नेते मोहित कंबोज यांचं एक ट्विट कारणीभूत ठरलंय. विशेष म्हणजे त्यानंतर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई | 27 सप्टेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट सत्तेत सहभागी होऊन आता दोन महिने होत आले आहेत. असं असताना सत्ताधारी पक्षामध्ये धुसफूस सुरु आहे की काय? अशा चर्चेला उधाण आणणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जातोय. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याशिवाय अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी बॅनर्सही झळकत आहेत. असं असताना भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलं. पण ते ट्विट त्यांनी थोड्या वेळाने डिलीटही केलं.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक ट्विट केलं. पण या ट्विटमुळे ते स्वत:च अडचणीत आले. “मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नाही, तर 145 आमदार लागतात”, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं. त्यांचं हे ट्विट म्हणजे अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर खोचक टीका आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर वरिष्ठांकडून तंबी आल्यानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट डिलीट केलं. मोहित कंबोज यांच्या या ट्विटमुळे महायुतीतही मुख्यमंत्री पदावरुन धुसफूस असल्याचं चित्र आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण
मोहित कंबोज यांच्या ट्विटबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी मात्र या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “असं लिहिलं म्हणजे अजित पवार गटाला डिवचलं का? 145 आमदार लागतात ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे यात डिवचणं वगैरे असं काही नाहीय. आपापल्या कार्यकर्त्याला वाटतं की, आपला नेता मंत्री, मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. कुणाला नाही वाटत? यात काही वेगळं नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
‘आपल्याला ताकद दाखवावी लागेल’
विशेष म्हणजे मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठं वक्तव्य केलं. अजित पवार गटाची आज मुंबईत गरवारे क्लब हाऊस येथे बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी युतीमध्ये गेल्यावर आता आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल, असं वक्तव्य केलं. ताकद दाखवल्याशिवाय युतीत हक्काची जागा मागता येणार नाही, असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय.
प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले?
“मुंबईत आज 36 विधानसभेच्या जागा आहेत. महाराष्ट्राच्या 15 टक्के जागा तर फक्त मुंबईत आहेत. तुम्ही युतीत गेल्यानंतर आपली ताकद दाखवल्याशिवाय कुणी आपल्याला न्याय करुन देईल अशी अपेक्षा बाळगणं कसं योग्य राहील? त्यामुळे आपल्या सर्वांना आपली ताकद उभारल्याशिवाय उद्या मुंबईत आपल्याला हक्काने कोणतीही जागा मागता येणार नाही. तुम्ही 15 दिवसांत सर्व आराखडा तयार करा. चर्चा करा आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूर्ण मुंबईची नवी कार्यकारिणी जाहीर करा”, असं प्रफुल्ल पटेल आजच्या बैठकीत म्हणाले.
दरम्यान, “आम्ही महाराष्ट्रात काम करत असताना मुंबईमध्ये जास्त लक्ष देऊ शकलो नाही, असं अजित पवार म्हणाले. आपण मुंबईत जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत. त्याला आम्ही सुद्धा जबाबदार आहोत. आम्ही मुंबईत जेवढं लक्ष द्यायला हवं होतं तेवढं देऊ शकलो नाहीत”, अशी भूमिका अजित पवारांनी आजच्या भाषणात मांडली.