मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक मराठा कार्यकर्ता नारायण राणे यांना फोन करतो. सुरुवातीला नारायण राणे यांचे पीए किंवा त्यांच्याशी संबंधित इतर कर्मचारी फोनवर बोलतात. त्यानंतर ते नारायण राणे यांच्याकडे फोन देतात. मराठा कार्यकर्ता आणि नारायण राणे यांच्यात अर्धा मिनिटे चर्चा होते. यावेळी दोघांमध्ये वाद होता. यावेळी नारायण राणे संबंधित मराठा कार्यकर्त्याला शेवटी शिवीगाळ करतात, असं कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आहे. या कथित ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण क्लिपमधील आवाज नारायण राणे यांच्यासारखाच येतोय. संबंधित क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोन करणारा मराठा कार्यकर्ता आपली ओळख रविंद्र मुटे अशी सांगतो. आपण छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय, असंही रविंद्र मुटे सांगतो. त्यानंतर त्याचा नारायण राणे यांच्यासोबत वाद होतो, असं कथिक ऑडिओ क्लिपमध्ये समजत आहे. दरम्यान, संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिपवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. नारायण राणे एवढे छोटे नेते नाहीत. नारायण राणेंबद्दल जे काही आले ते तपासून घेतलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
कधी-कधी असे फेक कॉल खूप लोक तयार करतात. राणे एवढे छोटे नेते नाहीत. मराठा समाजाचा आरक्षण देण्याकरता मोठं काम नारायण राणे यांच्या समितीने केलं होतं. त्यामुळे नारायण राणेंबद्दल जे काही आलं ते तपासून घेतलं पाहिजे. आपण सांगत आहात. मात्र मला माहिती आहे, राणे एवढे छोटे नेते नाहीत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे.
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – हॅलो
नारायण राणे यांचे पीए – हॅलो
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – हॅलो, जय शिवराय!
नारायण राणे यांचे पीए – कोण बोलतंय?
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – छत्रपती संभाजीनगर येथून रविंद्र मुटे बोलतोय. राणे साहेब आहेत का?
नारायण राणे यांचे पीए – साहेब काय नाव सांगितलं?
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – एक मिनिट
नारायण राणे – हॅलो!
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – राणे साहेब, जय शिवराय.
नारायण राणे – काय?
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – जय शिवराय म्हटलं.
नारायण राणे – कोण बोल रहा है?
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – रविंद्र मुटे बोलतोय.
नारायण राणे – बोलाना
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – जय शिवराय म्हटलं साहेब!
नारायण राणे – हा, जय शिवराय!
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – जय शिवराय मला तीनदा म्हणावं लागलं तेव्हा तुम्ही जय शिवराय म्हटले साहेब. आपल्याला जय शिवराय म्हणायला लाज वाटते का? आपण मराठा आहेत ना साहेब?
नारायण राणे – ए…! सरळ बोल. सरळ बोल!
मराठा कार्यकर्ते रविंद्र मुटे – सरळच बोलतोय.
नारायण राणे – तसंही या फोनमुळे तू आज ना उद्या मला भेटणारच आहे. अरे ***, कसले मराठे ****!