Pankaja Munde | केंद्र सरकारच्या ‘त्या’ कृतीवर पंकजा मुंडे यांची जाहीर नाराजी, पाहा नेमकं काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारखान्याने 19 कोटींचा जीएसटी कर भरला नसल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
पुणे| 25 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याची माहिती समोर आलीय. जीएसटी विभागाने सहा महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या या साखर कारखान्यावर धाड टाकली होती. यावेळी जीएसटी विभागाने काही कागदपत्रे जमा केली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कारखान्याने तब्बल 19 कोटींचा जीएसटी कर भरला नसल्याची माहिती समोर आलीय. याशिवाय या बँकेने युनियन बँकेकडून तब्बल 1200 कोटींचं कर्ज घेतलंय. त्या कर्जाची परतफेड करु न शकल्याने यूनियन बँकेने या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केलीय.
यूनियन बँकेने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला सील केलेला असताना आता या कारखान्याचा जीएसटी कर बुडाल्याची माहिती समोर आली. जीएसटी विभागाने या प्रकरणी कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर स्वत: पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडे आज पुण्यात मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण काय?
“ही घटना दोन-तीन महिन्यांपूर्वीदेखील घडली होती. आताही झालीय. आमचा त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. तो उद्योग पूर्णपणे नुकसानीत आहे. आठ-दहा वर्षे सातत्याने दुष्काळ आल्यामुळे तो कारखाना लिक्विडेशनच्या परिस्थितीत आहे आणि बँकेकडे गहाण आहे. त्यामुळे हे सर्व फॅक्ट्स आहेत. जे आकडे सांगितले जात आहेत ते व्याजाचे आहेत. चुकीच्या पद्धतीने काहीच झालेलं नाही”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडेंनी व्यक्त केली जाहीर नाराजी
“कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चाललाच नाही. आठ-नऊ कारखाने दिल्लीत केंद्र सरकारकडे गेले होते. त्यातही माझं नाव होतं. पण मी सोडून इतर सर्व जणांना मदत मंजूर झालीय. ती मदत झाली असती तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या. खरंच माझ्या कारखान्याची अडचण झाली नसती”, अशी नाराजी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
भाजपमधून डावललं जातंय?
भाजपमधून डावललं जातंय का? मदत का केली गेली नाही? असे प्रश्न पंकजा यांना विचारलं असता, “याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. मदतीच्या यंत्रणा देऊ शकतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना आहे. ते ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यांनी खूप हालाखीत तो कारखाना उभा केला आणि मी खूप अडचणीत तो कारखाना सुरु ठेवला. कोरोना संकट आलं तेव्हा माझ्या अगदी नाका-तोंडात पाणी जायची परिस्थिती झाली. तो कारखाना आता बँकेकडे आहे”, असं त्यांनी सांगितलं.
भाजपमध्ये कोंडी होतेय का?
“कारखान्यावर कुणाचं प्रभुत्व आहे ते महत्त्वाचं नाही. पण कारखान्यावर तिथल्या नागरिकांच्या अर्थव्यवस्था अवलंबून आहे. जर असे हजार युनीट सरकारने चालवले तर खूप लोकांना आधार मिळेल, अशी माझी मागणी होती. पण त्याचं काय झालं, याचं उत्तर मी देऊ शकत नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुमची कोंडी होते का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना यावेळी विचारण्यात आला. “त्यावर मी कोंडी होण्याइतकी लहान नाहीय. मी व्यवस्थित माझ्या संघर्षातून सुंदर मार्ग काढेन”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.