सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांचा 3 जानेवारीला रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. या अपघातानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाऊ धनंजय यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पंकजा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“धनंजय यांची आता तब्येत बरी आहे. त्यांचा अपघात झाला तेव्हा मी नाशिकला होती. मी आता नाशिकवरून आले म्हणून आज भेटायला आले”, असं पंकजा यांनी सांगितलं.
“धनंजय यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यांना मी सांगितलं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. वाहन वगैरे व्यवस्थित चालवा”, असं देखील पंकजा ताईंनी सांगितलं.
“डॉक्टरांची भेट झाली नाही. मी घरगुती भेट दिली. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली”, असं पंकजा म्हणाल्या.
“पेशंटला बोलायचं म्हणजे इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या. पेशंटला आजारपणाविषयी काय बोलायचं? त्यांच्या पत्नीही आल्या होत्या. त्यांच्याशीही बोलत बसले”, असंही पंकजा यांनी सांगितलं.
“मी बहीण आहे. मागेही धनंजय अॅडमिट होता. त्यावेळेलाही मी आले होते. राजकारणात सगळे नेते भेटायला येतात. मी तर घरातली आहे”, असं पंकजा म्हणाल्या.
“राजकारणात आमचे विचार नेहमीच वेगळे राहिले. कोणाला बरं नाही तर भेटणं ही आमची संस्कृती आहे आणि आमचं तर रक्ताचं नातं आहे”, असं पंकजा म्हणाल्या.
“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात नाही. कारण तो दौरा शासकीय आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
‘धनंजय मुंडे यांच्या 7-8 नंबरच्या बरगड्यांना फ्रॅक्चर’, अजित पवारांची माहिती
धनंजय मुंडे यांना अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. अजित पवार यांनी यावेळी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांना माहिती दिली होती.
“डॉक्टरांनी पूर्णपणे तपासणी केलेली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना थोडसं फ्रँक्चर झालंय. तरीदेखील आपण 24 तास लक्ष देऊ. त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली होती.