राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत; गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटाविरोधात कट होता? प्रवीण दरेकर यांचा थेट आरोप
महाराष्ट्राच्या राजकारणात आता मोठ्या घडामोडींचे संकेत मिळताना दिसत आहेत. कारण शिवसेना नेते शिशिर शिंदे यांच्या आरोपांनंतर आता भाजप नेते प्रविण दरेकर यांनीदेखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात आता पक्षांतर्गत मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आहेत. पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. अमोल कीर्तिकर हे मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार होते. आता निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. पण मतदानानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तिकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तिकर यांचा कट होता, असा थेट गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी मागे घेणार. अशा पद्धतीने आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचं, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता”, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय.
“एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला. ते वरिष्ठ नेते आहेत. त्या दृष्टीने त्यांना वागणूक दिली. पण कीर्तिकरांचा उद्देशच संशयास्पद होता. ते आता हळूहळू बाहेर येताना दिसत आहे”, असा देखील मोठा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार?
गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची मोठी बातमी सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून गजानन कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर गजानन कीर्तिकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकर यांच्याच गाडीत होते. त्यांनी अमोल कीर्तिकर यांना मदत केली, असा आरोप शिशिर शिंदे यांनी केला आहे. याप्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.