मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वाढत्या कोरोना संसर्गावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. मुख्यमंत्री हतबल आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबाचंही संरक्षण करू शकले नाहीत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. (Bjp Leader Pravin Darekar Slams Cm Uddhav Thackeray)
प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांवरही टीका केली. मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. काय उपयायोजना करायच्या हे ते लोकांना विचारत आहेत. कोरोनाच्या संकटात जनतेला मदत काय करणार हे मुख्यमंत्री सांगत नाहीत, असं दरेकर म्हणाले.
आरोग्य यंत्रणा फोल
राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
आव्हाडांना आकडेवारी देऊ
यावेळी त्यांनी आव्हाडांवर टीका केली. आव्हाड म्हणतात 20 लाख कोटी रुपयांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले? आव्हाडांनी महाराष्ट्राच्या वाट्याला किती आले हे एकदा तपासून पाहवं. केंद्र सरकारने इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे. केंद्र सरकारने अन्नधान्यांपासून ते कोरोनाच्या लसीपर्यंत सर्व सुविधा महाराष्ट्राला दिल्या आहेत. त्याची आव्हाडांना कल्पना नसावी. पण आम्ही आव्हाडांना त्याची आकडेवारीच पाठवून देऊ, असं सांगतानाच केवळ अपयश आल्याने आघाडी सरकारकडून भावनिक आवाहन केलं जात आहे. लोकांना संभ्रमित केलं जात आहे, असंही ते म्हणाले.
आम्ही रस्त्यावरच
मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही रस्त्यावर उतरूच. तुम्ही मातोश्रीत बसून होतात. त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो. पण तुम्ही लोकांमध्ये जा आणि लॉकडाऊनमुळे होणारं त्यांचं नुकसान समजून घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्रीच राजकारण करत आहेत
आम्ही राजकारण करत नाही. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक राजकारण करत आहेत. विरोधकांनी राजकारण करू नये. असं सांगतानाच मुख्यमंत्रीच स्वत: शेरेबाजी करत विरोधकांवर टीका करत आहेत. हे राजकारण नाही का? असा सवाल करतानाच कोरोनाला सव्वा वर्षे झाले आहे. या सव्वा वर्षात मुख्यमंत्र्यांनी केवळ विरोधकांशी एकदाच संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत विरोधकांशी काहीच चर्चा केली नाही. मुख्यमंत्र्यांचा केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांच्या पायात पाय नाही. त्यांच्यातच समन्वय नाही. तुम्हीच पायात पाय घालून पडणार आहात, असा चिमटाही त्यांनी काढला. (Bjp Leader Pravin Darekar Slams Cm Uddhav Thackeray)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 April 2021https://t.co/x62wzAztBy
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2021
संबंधित बातम्या:
मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसात कठोर निर्णय, आता 4 एप्रिलपासून नवे नियम काय असू शकतात?
वर्षा राऊत यांना कोरोना, संजय राऊत यांनाही चाचणी करावी लागणार, काल राऊत-पवार भेटीमुळे टेन्शन वाढलं
(Bjp Leader Pravin Darekar Slams Cm Uddhav Thackeray)