मयुरेश जाधव, ठाणे, मुंबई, दि.3 फेब्रुवारी 2024 | कल्याण डोंबिवली शहरात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोर झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले. त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाचे अपडेट डॉक्टरांनी दिले आहे. त्याची माहिती कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.
गोपाळ लांडगे म्हणाले की, डॉक्टरांचा सांगण्याप्रमाणे महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.
उल्हासनगर फायरिंग प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड व त्याचा सहकारी आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाला.
हे ही वाचा
भाजप आमदाराची दबंगगिरी, पोलिसी ठाण्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार, आमदारास अटक