आमदार गणपत गायकवाड यांचं अन्नत्याग, पेलिसांच्या विनंतीनंतरही जेवणाला नकार
भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून ते जेवणास नकार देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनील जाधव, Tv9 मराठी, मुंबई | 5 जानेवारी 2024 : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. गणपत गायकवाड यांना गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. गणपत गायकवाड यांनी आपला गुन्हा मान्यदेखील केला आहे. या प्रकरणी क्राईम ब्रांचकडून सखोल तपास केला जात आहे. गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. तर राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या काढण्यात आल्या आहेत. दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी आता पोलिसांकडून वेगाने तपास सुरु आहे.
गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांनी गोळीबार केल्यानंतर आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे वातावरण तापलं आहे. गणपत गायकवाड यांनी मुख्यंत्र्यांवर गंभीर आरोप केल्यामुळे आज शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जावी, अशी मागणी काही जणांकडून केली जात आहे. पण भाजप नेते अतुल भातखळकर यांनी तो आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतची कारवाई करण्यासाठी शिस्तभंग समिती आहे. ही समिती याबाबत निर्णय घेते, असं भातखळकर यांनी स्पष्ट केलं.
गुन्हे शाखेकडून वेगाने तपास
दुसरीकडे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 6 विविध पथके तयार केले आहेत. हे पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक टीम आज द्वारली गावात पोहोचली. द्वारली गावातील ज्या जागेवरुन हा वाद उफाळला होता त्या ठिकाणी गुन्हे शाखेची टीम गेली. गुन्हे शाखेकडून नेमकं प्रकरण काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. गुन्हे शाखेच्या टीमकडून जमिनीचे कागदपत्रे शोधण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. गुन्हे शाखेने जागेची पाहणी केल्यानंतर हे पथक हिललाईन पोलीस ठाण्यात पोहोचलं. इथे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत फरार आरोपींना कसं शोधावं, तसेच सीसीटीव्हीतील आरोपींची ओळख कशी पटवावी, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या विनवणीनंतर गायकवाडांनी घेतला चहा
एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केल्याची माहिती समोर आली आहे. गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टाने 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गणपत गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असल्यापासून त्यांनी जेवणाला नकार दिला आहे. पोलिसांनी विनवण्या केल्यानंतर ते चहा घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच गणपत गायकवाड यांना कुटुंबिय आणि इतर कुणाला भेटू दिलं जात नाही म्हणून ते नाराज असल्याचीदेखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
तीनही आरोपींना घरचं जेवण देण्यास बंदी, सूत्रांची माहिती
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचे दोन साथीदार हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना भेटण्यासाठी कळवा पोलीस आणि गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. या तीनही आरोपींना घरचं जेवण देण्यास बंदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष पथकाकडून तीनही आरोपींना जेवण, नाश्ता आणि चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात येतेय. अटक असलेल्या आरोपींना विशेष पथकाशिवाय कोणाला भेटू दिलं जात नाहीय, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.