मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुंबई भाजपा (Bjp) अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा तर्फे मंत्रालय परिसरातील गांधीजींच्या पुतळ्या जवळ साखळी उपोषण करण्यात येत आहे. जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिला. देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरळ ओकली आहे. नाना पटोले यांच्यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदारमंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भाजपा मुंबई तर्फे मंत्रालय परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.
लोढा यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
“अटक करा, अटक करा, नानाला अटक करा” अशा घोषणा त्यावेळी देण्यात आल्या. त्यावेळी बोलताना मंगल जी म्हणाले की, नाना पटोले यांचे वागणे म्हणजे “विनाश काले विपरित बुध्दी” असे झाले असून नाना पटोले वारंवार माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी याच्या विरोधात गरळ ओकत आहेत. आधी पंजाब आणि आता महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांचे मोदींना जीवे मारण्याचे उद्देश उघडपणे जनतेसमोर आले आहे. यासंदर्भात गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांची मंत्र्यालयात जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले की, योग्य ती कारवाई केली जाईल.जोपर्यंत नाना पटोले यांच्यावर एफ. आय. आर. व अटक होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या तीन दिवसांपासून गदारोळ सुरूच
या आंदोलनात भाजपा मुंबई उपाध्यक्षआचार्य पवन त्रिपाठी, आमदार राहुल नार्वेकर, आमदार राजहंस सिंह, भाजपा मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई भाजपा जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर तसेच इतर पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नाना पटोलेंच्या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा गदारोळ सुरू आहे. कालही भाजपकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. आज नगरपंचायतीच्या निवडणुकीत हा मुद्दा थोडा मागे जरी पडला असला, तरी मुंबईत याचे आजही पडसाद उमटले आहेत.