मुंबई : लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक… प्रत्येक निवडणुकीत भाजप पंतप्रधान पदाचा आणि मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करते. त्या उमेदवाराच्या नेतृत्वातच निवडणुका लढवत असते. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी मात्र, फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच दिसतेय. कारण भाजपने राज्यात शिवसेनेच्या फुटीर गटासोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे. त्यामुळे भाजप कुणाच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढवणार आणि भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीबाबत अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही पक्ष किंवा कार्यकर्त्याला वाटतं की आपलाच नेता मुख्यमंत्री बनावा. पण मी स्पष्टपणे सांगतो 2024 ची निवडणूक ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढू आणि जो मुख्यमंत्री असतो तोच नेता असतो. त्याच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाते, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? हे तुम्हाला विचारायचं असेल तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारा. भाजपमध्ये सर्व निर्णय संसदीय बोर्ड घेतात. याबाबत कमेंट करण्याचा अधिकारही मला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. नेहमी प्रत्येक प्रश्नावर स्पष्ट मत मांडणारे फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर मात्र बॅकफूटवर दिसले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. निवडणुकीनंतर पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री म्हणून येणार की फडणवीस यांना संधी मिळणार? अशी चर्चा आता रंगली आहे. फडणवीस बॅकफूटवर गेल्याने फडणवीसांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचंही काही जाणकारांचं मत आहे. तर निवडणुकीनंतर अनेक गोष्टी बदलतील. त्यामुळे आताच या गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही, असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
मध्यंतरी शिंदे गटाकडून वर्तमानपत्राला एक जाहिरात देण्यात आली होती. त्यात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असं लिहिण्यात आलं होतं. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी माझ्याशी चर्चा केली. आमच्या लोकांनी जाहिरात देणं चूक केल्याचं सांगितलं. शिंदे आणि माझ्यात उत्तम संवाद आहे. आमच्यात उत्तम समन्वय आहे. तो क्वचितच युती सरकारमधील कुणात असेल. मी कधीही शिंदे यांचा मानसन्मान, प्रोटोकॉल तोडत नाही. तसेच मी उपमुख्यमंत्री असल्याचं ते कधीच मला भासवू देत नाहीत, असंही फडणवीस यांनी सांगितलं.