मुंबई : ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या वतीने राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मुंबईत मुलुंड टोल नाक्यावर भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि विधानसभा मुख्य प्रतोद आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करुन चक्का जाम केला. “ओबीसी कें सन्मान में भाजपा मैदान में…” असा नारा देत ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले, असल्याचे भाजपकडून सांगण्यात आलं आहे. (BJP protest at Mulund toll plaza for OBC reservation, Ashish Shelar in police custody)
यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेजा, पराग शाह, पालिका गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नील सोमय्या, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, रजनी केणी, जागृती पाटील आदींसह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक रोखत हे आंदोलन करण्यात आले. अखेर पोलिसांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यांना नवघर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारच्या उदासिनतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. जोपर्यंत दोन्ही समाजाला दोन्ही आरक्षणे मिळत नाही तोपर्यंत भाजपा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आजपासून या संघर्षाला सुरुवात झाली आहे. यापुढे जर आंदोलन चिघळले तर त्याला सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार असेल.
ओबीसी आरक्षणाविरोधात ज्या दोघांनी याचिका केली ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे काँग्रेस ओबीसी आरक्षणावरुन समाजाला फसवत आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये मानाचे स्थान कसे? याचं उत्तर ओबीसी मंत्री विजय वड्डेटीवार यांनी द्यायला हवे, अशा शब्दांत आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.
ओबीसी कें सन्मान में भाजपा मैदान में… असा नारा देत आज ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी आम्ही भाजपा कार्यकर्त्यांनी मुलुंडच्या टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केले. @BJP4India @BJP4Maharashtra @bjp4mumbai @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/gm5bHHvKeo
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 26, 2021
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही, अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर केली. तसंच आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, असा पुनरुच्चार देखील केला. त्या पुण्यात बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत.”
हे ही वाचा :
तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल
OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो!’
(BJP protest at Mulund toll plaza for OBC reservation, Ashish Shelar in police custody)