विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : भाजपने वरळीत ठाकरे गटाला राजकीय धक्का देण्यासाठी तयारी सुरु आहे. मंत्री मंगल प्रभात लोढांकडून वरळीच्या जांबोरी मैदानात क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. विटी-दांडू, लगोरी, लेझिम, आखाडा कुस्ती, पावनखिंड दौड, शरीर शौष्ठव, पंजा लढवणे आणि ढोलताशा अशा 16 देशी खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. मंत्री लोढांकडून ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभा’चे आयोजन करण्यात येत आहे. 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील विविध मैदानांवर स्पर्धा होणार आहे. या स्पर्धांसाठी 2 लाखांपेक्षा जास्त खेळाडूंकडून नोंदणी करण्यात आली आहे.
स्पर्धांची सुरुवात आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून करण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून ठाकरे गटाला धक्का देण्याची तयारी सुरु झाली आहे. तरुण खेळाडूंना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी २६ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई शहरात आणि उपनगरात प्रथमच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन २६ जानेवारीला वरळीतील जांभोरी मैदान येथे होणार आहे. या स्पर्धांमध्ये लगोरी, लेझिम, लंगडी, पंजा लढवणे, दोरीच्या उडया, रस्सीखेच, फुगडी, मल्लखांब, कबड्डी, मानवी मनोरे, आखाडा, कुस्ती, पावनखिंड दौड, खो-खो, विटीदांडू, शरीर शौष्ठव, ढोलताशा या १६ पारंपारिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सव्वादोन लाख खेळाडूंनी नोंदणी केली आहे. दरम्यान, या स्पर्धांच्या आयोजनामुळे ठाकरे गट विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे.