मुंबई : राज्यातील सरकार येत्या 15 ते 20 दिवसात कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल केला होता. आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच पाकिस्तानचा मुद्दा वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका जिंकूनच दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.
राज्यातील सरकारला धोका नाही. पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. त्यांच्या मताशी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपला जे हवं ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर केला. ते काम पूर्ण झालं. पण महाराष्ट्रात जे राजकीय साध्य करायचं होतं ते भाजपला करता आलं नाही. भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. मिंधे आल्यापासून भाजपही रसातळाला जात आहे, त्यामुळेच मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले.
शिवसेना कुणाची हे पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना ठाकऱ्यांची आहे. हे उद्धव ठाकरे म्हणाले. ते बरोबर आहे. पण निवडणूक आयोगाला कळत नाही. त्यात चुकीचं काय? असं बोलणारे निवडणुका जिंकण्यासाठी वारंवार पाकिस्तानचाच जप करतात. पाकिस्तानशिवाय मोदींनी निवडणुका जिंकून दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.