भाजप राज्यातच काय देशातही सत्तेत येणार नाही, राऊतांपाठोपाठ पटोलेंनी भाजपला डिवचले
भाजपने स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात.
मुंबई: भाजपने (bjp) स्वत:च अंधाऱ्या विहिरीत उडी मारली आहे. त्यांचा पक्ष जागतिक स्तरावरचा पक्ष आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल असं ते सांगू शकतात. पण काही झालं तरी महाराष्ट्रात (maharashtra) त्यांचा मुख्यमंत्री होणार नाही, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या या दाव्याची रि ओढली आहे. शिवसेना नेते संजय राऊत म्हणतात ते बरोबर आहे. राज्यातच काय देशातही भाजप सत्तेत येणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले (nana patole) यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती हल्लाही चढवला.
नाना पटोले यांनी यावेळी नगराध्यक्ष निवडणुकीवरही भाष्य केलं. भाजपला रोखण्यासाठीच महाविकास आघाडी तयार करण्यात आली होती. आता नगरपंचायत निवडणुका झाल्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यातील जनतेला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. आम्ही जनतेच्या कौलचा आदर केला आहे. आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्यामुळे कार्यकर्त्यांना जर त्या पद्धतीने सूचना केल्या तर स्थानिक कार्यकर्ते एकत्र बसून निर्णय घेतील. सर्व अडचणी दूर होतील. कुठेही गडबड होणार नाही. ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचा नगराध्यक्ष बसवायचा असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचे नेते आणइ कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असं पटोले यांनी सांगितलं.
दिवास्वप्न पूर्ण होणार नाही
भाजपनेही नगराध्यक्ष बसवण्याची स्ट्रॅटेजी केली आहे, याबाबत नाना पटोले यांना विचारण्यात आलं. त्यावर, आमचाही तोच संकल्प आहे. भाजपने काय करावं आणि काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीचा जो घटक पक्ष आहे, त्याचाच अध्यक्ष असेल. कुठेही गडबड होणार नाही. भाजपने कितीही दिवास्वप्न पाहिलं तरी ते पूर्ण होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
गाव तिथे बियर शॉपीचा निर्णय भाजपचाच
यावेळी त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावरही भाष्य केलं. जेव्हा फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी डान्सबार सुरू केले होते. देशी बारची दुकाने सुरू केली होती. त्यांचे नियम शिथिल केले. गाव तिथे बियर शॉपीचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या आदेशाने हा निर्णय झाला. आता भाजप कोणत्या मुद्द्यावर राजकारण करत आहे हे कळत नाही. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आदी मूळ प्रश्न कसे बाजूला सारता येतील आणि नवीन वाद कसे निर्माण होतील हे भाजप करत आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
काहीही झालं तरी महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही; संजय राऊतांचा मोठा दावा