Nanded Lok Sabha By Election Result 2024 Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघात पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला होता. परंतु पाच महिन्यात या निकालात मोठी उलथापालथ झाली आहे. पाच महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाले आहे.
नांदेड लोकसभा मतदार संघात एप्रिल मे महिन्यांत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या दोन महिन्यांत वसंत चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण मैदानात होते. भाजपकडून डॉ. संतुक हंबार्डे मैदानात होते. त्यात 425574 मते घेत डॉ. संतुक हंबार्डे यांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांना 390149 मते मिळाली. त्याचा पराभव झाला. या विजयामुळे भारतीय जनता पक्षातील लोकसभेतील एक जागा वाढली आहे. भाजपला लोकसभेत स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आहे. आता डॉ. संतुक हंबार्डे यांच्या विजयामुळे भाजपची संख्या वाढली आहे.
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्या वसंत चव्हाण ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या खात्यात होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.
नांदेड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत विधानसभेच्या 6 जागा आहेत. या जागेवर १९५२ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे शंकरराव तेलकीकर विजयी झाले होते. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेसने देवराव नामदेवराव कांबळे यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. १९६२ मध्ये काँग्रेसचे तुळशीदास जाधव विजयी झाले. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने येथून उमेदवार बदलून व्यंकटराव तिरोडकर यांना उभे केले आणि ते विजयीही झाले.