पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार बोनस?, सोमवारी बोनस जाहीर होणार; मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा यशस्वी
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या वर्षी 15 हजार बोनस देण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. यासंदर्भातील घोषणा मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी करणार आहेत.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बोनससंदर्भात कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक बैठक पार पाडली आहे. त्यानुसार यंदाच्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 15 हजार बोनस देण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. काल (शुक्रवारी) झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा झाला असून बोनससंदर्भातील घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सोमवारी करणार आहेत. (BMC Employee Bonus Declare On Monday Mayor Kishori Pednekar)
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बोनस संदर्भात बैठक पार पडली होती. परंतु या बैठकीत तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे बोनसचा चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेला. त्यावर मुख्यमंत्री आणि कामगार संघटनांच्या शिष्टमंडळामध्ये बोनससंदर्भात चर्चा झाली.
यंदा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस हा 20 हजार रुपये देण्यात यावा अशी मागणी युनियनकडून करण्यात आली. मात्र मागील वर्षाच्या बोनस रकमेत कुठेही कटोती करु नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार यंदाच्या वर्षी 15 हजार बोनस दिला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येतीये.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जवळपास 7 महिने सगळे व्यवहार ठप्प होते. याला देशाची आर्थिक राजधानी मुंबई देखील अपवाद नव्हती. त्याचमुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती म्हणावी अशी चांगली नाहीये. अशा परिस्थितीत देखील कोरोनाच्या काळात पालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यामुळे यंदा सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. तर त्याच्या मागील दोन वर्षी 14 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता. यंदाच्या वर्षी 20 हजार रुपये बोनस देण्यात यावा अशी मागणी युनियनकडून करण्यात आली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती आणि ओढावलेलं आर्थिक संकट लक्षात घेता मागील वर्षाच्या बोनस रकमेत कुठेही कटोती करु नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.
(BMC Employee Bonus Declare On Monday Mayor Kishori Pednekar)
संबंधित बातम्या
यंदा दिवाळीत बोनस न मिळाल्यास तीव्र आंदोलन, पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा इशारा